कोकण : राजापूरला पुराचा वेढा | पुढारी

कोकण : राजापूरला पुराचा वेढा

राजापूर; पुढारी वृत्तसेवा : गेले दोन दिवस राजापूर तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अर्जुनेसह कोदवली नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, दोन्ही नद्यांचे पाणी राजापूर जवाहर चौकाला वेढा देत शिवपुतळ्यासमोरील जामा मसजिदीपर्यंत पसरल्याने शहरातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला होता. पुराचे पाणी वाढू लागताच नेहमीप्रमाणे शहरातील व्यापार्‍यांनी आपापला माल सुरक्षित स्थळी हलवायला सुरुवात केली केली होती.

दरम्यान, अतिवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर तालुका प्रशासनासह पोलिस प्रशासन सतर्क होते. मागील काही दिवस कमी प्रमाणात पडणार्‍या पावसाने शनिवारी रात्रीपासून जोमाने पुनरागमन केले. सरींवर सरींनी पाऊस कोसळत होता. रविवारी दिवसभर पावसाचा जोर होताच. मात्र, रात्रीपासून तो आणखीन वाढला होता. सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता. दरम्यान, सर्वत्र जोरदार पाऊस पडत असल्याने तालुक्यातील अर्जुनेसह कोदवली नदीला मोठा पूर आला होता. पूर्व परिसरात तर आजुबाजूंच्या गावात महापूराचे पाणी पसरले होते. काही ठिकाणी तर ओणी अणुस्कुरा मार्गाला पुराचे पाणी लागले होते. नद्यांसह वहाळ नालेही ओसंडून वाहत होते.

राजापूर शहरात पुराचे पाणी भरल्याने जवाहर चौकापर्यंत येणारी एसटी वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला. शहरातील बंदर धक्का मार्गासह छत्रपती शिवाजी पथासह चिखलगाव, शीळ रस्ता रविवारपासूनच पुराच्या पाण्याखाली गेला होता. मुसळधार कोसळणार्‍या पावसात तालुक्यात पडझडीच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यांवर झाडे पडून वाहतूक बंद पडली होती. काही ठिकाणी विद्युत पोल कोसळून महावितरणचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या होत्या. तालुक्यात पावसाचा जोर वाढला असतानाच सुरक्षीततेचा उपाय म्हणून शाळा,विद्यालये दुपारी सोडण्यात आली.

ऐन सणासुदीच्या दिवसात मुसळधार कोसळणार्‍या पावसामुळे बाजारपेठेवर परीणाम झाल्याने ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागला तर आपल्या मालाचे नुकसान होऊ नये म्हणून व्यापार्‍यांनी माल सुरक्षित ठिकाणी हलविला होता.

तालुक्याच्या पूर्व परिसरातून वाहणार्‍या अर्जुना नदीसह कोदवलीकडून आलेल्या नदीला महापूर आला होता. दोन्ही नद्या दुथडी भरुन वाहत होत्या. पूर्व परिसरातील नदीकाठावरील परिसरात पुराचे पाणी पसरले होते. दोन दिवस पडत असलेल्या पावसाने जोरदार तडाखा दिला. तालुक्यात पावसाचा जोर वाढला असताना राजापूरच्या तहसीलदार श्रीमती शितल जाधव व त्यांचे प्रशासन यासह पोलिस प्रशासन सतर्क होते. सर्व शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्यांच्या मुख्यालयातच रहावे, अशा सूचना देण्यात आल्या.

दोन दिवस ‘रेड अलर्ट’
जगबुडी आणि काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शास्त्री तसेच कोदवली आणि बाव नदी या इशारा पातळीच्या वर वाहत आहेत. काजळी नदीने धोकापातळी ओलांडल्याने आंजणारी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आ हे. रघुवीर घाटात रविवारी दरड कोसळल्याने हा मार्ग बंद करण्यात आला होता. तर दरड हटवून हा मार्ग सोमवारी एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न बांधकाम विभागातर्फे सुरू होता. आगामी दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार ते अतीमुसळधरा पावसाची शक्यात असून दोन दिवस रेड अलर्ट कायम करण्यात आला आहे.

 

Back to top button