रत्नागिरी : माखजन येथे मुसळधार पावसाने शिरंबे-पुऱ्ये मार्गावर दरड कोसळली, आठ तासांनंतर वाहतूक सुरळीत | पुढारी

रत्नागिरी : माखजन येथे मुसळधार पावसाने शिरंबे-पुऱ्ये मार्गावर दरड कोसळली, आठ तासांनंतर वाहतूक सुरळीत

आरवली; पुढारी वृत्तसेवा : माखजन परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यात दरम्यान, काल मध्यरात्री कासे शिरंबे – पुऱ्ये मार्गावर दरड कोसळली. यामुळे दुर्गम भागाचा माखजनशी असणारा संपर्क तुटला हाेता . आठ तासांच्या अथक प्रयत्नांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने दरड बाजूला करण्यात प्रशासनाला यश आल्याने मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

माखजन आरवली परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गडनदी दुथडी भरून वाहत आहे. मुसळधार पावसामुळे रात्री कासे शिरंबे – पुऱ्ये मार्गावर दरड कोसळली. यामुळे माखजन शिरंबे – पुऱ्ये मार्गावरचे दळणवळण ठप्प झाले. एसटी वाहतूकदेखील खोळंबली. यामुळे दुर्गम भागातील ग्रामस्थांचे हाल झाले.

दरड कोसळल्याने येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकर भुवड यांच्याशी संपर्क साधला. भुवड यांनी तहसीलदार सुहास थोरात यांना या बाबतची माहिती दिल्यानंतर महसूल यंत्रणा कामाला लागली. माखजनचे पोलीस कांबळे, तलाठी आंग्रे घटनास्थळी दाखल झाले. दरड बाजूला करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ शरदचंद्र विष्णू चव्हाण, संजय जनार्दन चव्हाण, सुभाष धोंडू चव्हाण, जितेंद्र सुभाष चव्हाण, सरपंच विष्णु मांडवकर, संतोष जड्यार, बाबू जड्यार, निर्मल आदींनी प्रशासनाला सहकार्य केले. आज रविवारी दुपारी दाेन वाजण्याच्या सुमारास हा मार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला.

हेही वाचलंत का? 

Back to top button