राजापूर; पुढारी वृत्तसेवा : राजापूर तालुक्यातील व्यापार्यांनी सावधानता बाळगणे महत्वाचे ठरणार आहे. कारण ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी राजापूरात सक्रीय झाली आहे. भारतीय सैन्यातील अधिकारी असल्याचे भासवून तशी ओळखपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड व अन्य कागदपत्रे पाठवून विश्वास संपादन केला जातो आणि मग ऑनलाईन पेमेंट करा सांगून फसवणूक केली जात आहे. अशा भामट्यांपासून सूज्ञ नागरिक व व्यापारी यांनी सावध रहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
जैतापूर, नाटे परिसरातील काही व्यवसायिकांना वेगवेगळ्या ऑर्डर देऊन, आपण भारतीय सैन्यातील अधिकारी असल्याचे भासवून तशी ओळखपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड व अन्य कागदपत्रे पाठवून विश्वास संपादन करून शासकीय काम करत असल्याने आम्हाला कॅश देता येत नाही असे सांगितले जाते. ऑनलाईन पैसे पाठविण्याच्या इराद्याने डेबीट कार्ड किंवा अन्य माहिती मागवून गंडा घालण्याची नवीन पद्धत भामट्यांकडून अवलंबली जात आहे. नुकताच एका व्यावसायिकाला अशाप्रकारे गंडा घालण्यात आला आहे. जैतापुरातील एका व्यावसायिकाच्या चाणाक्षपणामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान व फसवणूक होणार असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी ऑर्डरच दिली नाही. या शिवाय नाटे येथील एका व्यापार्याला मात्र गंडा घालण्यात हे भामटे यशस्वी झाले आहेत. त्याच्याकडून व्यवसायाच्या मालाची ऑर्डर घेऊन पैसे ट्रान्स्फर करायला सांगितले. आणि या भामट्यांनी पुन्हा तोंडच दाखवले नाही. याबाबतची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे.
अशाप्रकारे कोणत्याही ऑनलाईन फसवणुकीला बळी पडू नका आणि आपल्या बाबतीत अशी कोणतीही घटना घडल्यास तत्काळ आपल्या नजीकच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. राजापुरातील व्यापार्यांनी सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, ऑलाईन ठगांपासून राजापूर तालुका व्यापारी संघाच्या वतीनेही सावधानता बाळगावी, असे आवाहन व्यापार्यांना करण्यात आले.