रत्नागिरी : खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल | पुढारी

रत्नागिरी : खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल

खेड : खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या मुदतीत शासकीय निधीमधून त्यांच्या वाहनाला 5 लाख 15 हजार 479 रुपये 91 पैसे वापरून इंधन पुरवठा करत शासकीय निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी न.प.चे विद्यमान मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी खेड पोलिस ठाण्यात दि. 30 जुलै 2022 रोजी सांयकाळी उशिरा तक्रार दाखल केली आहे. न.प.चे माजी नगराध्यक्ष तथा मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी खेड पालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक व गटनेते प्रज्योत तोडकरी यांच्यासह सेनेच्या दहा नगरसेवकांनी केला होता. याबाबत त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे खेडेकर यांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी मुद्देसूद लेखी स्वरुपात केल्या होत्या.

या संदर्भातील आदेशांच्या अनुषंगाने खेड पालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी वैभव खेडेकर यांच्या विरोधात खेड पोलिस ठाण्यात दि.30 जुलै 2022 रोजी तक्रार दिली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 409 व 420 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पालिकेच्या पाच लाख 15 हजार 479 रुपये 91 पैसे एवढ्या रक्कमेचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला असुन, याप्रकरणी अधिक तपास खेड पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक सोनाली झेंडे करीत आहेत.

Back to top button