रत्नागिरी : मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्ह्यातील युतीचा निर्णय | पुढारी

रत्नागिरी : मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्ह्यातील युतीचा निर्णय

रत्नागिरी;  भालचंद्र नाचणकर : रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेप्रणीत शिवसेना आणि भाजपाची युती होण्याची शक्यता आहे. या युतीसंदर्भात उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे जबाबदारी माजी मंत्री रामदास कदम यांच्याकडे तर दक्षिण जिल्ह्याची जबाबदारी माजी मंत्री तथा रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्याकडे सोपवली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर या घडामोडींना वेग येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेप्रणीत शिवसेना आणि भाजपाची युती झाल्यानंतर भाजपासह मुख्यमंत्री गटाच्या शिवसेनेलाही राजकीय लाभ होणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदांच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली. जि. प. मध्ये तर भाजपाला स्थानच नव्हते. आता जि. प., पं. स. सह रत्नागिरी, खेड, चिपळूण, राजापूर नगर परिषदांच्याही निवडणुका लवकरच होणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी ही युती दोन्ही बाजूने वर्धक ठरणार आहे.

सन 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती नव्हती. त्यावेळी दापोली विधानसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवाराला 13 हजार 971, गुहागर मतदारसंघातून 39 हजार 761, चिपळूण मतदारसंघातून 9 हजार 143, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून 54 हजार 449 आणि राजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला 9 हजार 153 मते मिळाली होती. ही सर्व मते एकूण 1 लाख 27 हजार 277 इतकी असून या मतांमध्ये ही युती झाल्यानंतर वाढ होणे निश्‍चित आहे. त्याचवेळी या निवडणुकीत शिवसेनेची एकूण मते 3 लाख 57 हजार 43 इतकी आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या निशाणी वादावरून धनुष्यबाण ही निशाणी गोठवली गेली तर ही भाजप आणि मुख्यमंत्री गटाच्या शिवसेनेला परस्पर फायदेशीर ठरू शकणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेप्रणीत शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम हे उपनेते आहेत. त्याचबरोबर त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात आपला जनसंपर्क कायम ठेवला आहे. याच मुख्यमंत्री गटाचे माजी मंत्री तथा रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांचाही असाच दांडगा आणि परिणामकारक जनसंपर्क राहिला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांकडे जिल्ह्यातील युतीची जबाबदारी येणार आहे. या संदर्भात दोन्ही बाजूंच्या नेत्यांची प्राथमिक चर्चा झाली असून, मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर या युतीबाबतच्या अंतिम निर्णयापर्यंत जाता येऊ शकणार
आहे.

दोन नेते युती करणार भक्‍कम
उत्तर जिल्ह्यामध्ये मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर हे तालुके येतात. या तालुक्यांमधील युतीसाठी माजी मंत्री रामदास कदम यांच्याकडे जबाबदारी जाणार हे निश्‍चित मानले जात आहे. तर दक्षिण जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्‍वर, लांजा, राजापूर तालुक्यांतील जबाबदारी आमदार उदय सामंत यांच्याकडे येणार आहे. हे दोन्ही नेत्यांकडे समर्थक मोठ्या प्रमाणात असल्याने युती भक्‍कम होणार हे स्पष्ट आहे.

Back to top button