रत्नागिरी : पर्यटनाची नवी संकल्पना ‘कांदळवन गाव’ | पुढारी

रत्नागिरी : पर्यटनाची नवी संकल्पना ‘कांदळवन गाव’

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कोकण किनारपट्टी भागात असलेल्या समृद्ध कांदळवनांचे संवर्धन आणि संरक्षणासाठी ‘कांदळवन पर्यटनाची नवी संकल्पना’ राबविण्यात येणार आहे. कांदळवन पर्यटनाला गती देण्यासाठी ‘कांदळवन पर्यटन गाव’ हा पर्यटकांसाठी नवा प्रकल्प महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहभागाने हाती घेण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही योजना रत्नागिरी आणि देवगड येथे राबविण्यात येणार आहे.

कोकणातील कांदळवनाच्या समुद्धीला सुरक्षिततेचे कोंदण देण्यासाठी आणि पर्यटनांतून उद्योग निर्मितीसाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. निसर्गप्रेमी आणि अभ्यासक पर्यटकांसाठी खास ही पर्वणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यातून कांदळवनाच्या विविध प्रजातीवरही संशोधन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेरिटाईम मंडळाच्या नेतृत्वाखाली ही योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी एमटीडीसीचा सहभाग घेण्यात येणार आहे. किनारपट्टी अधिनियमन क्षेत्रांतर्गत (सीआरझेड) ठिकाण असल्यामुळे या परिसरातील कांदळवनांचे कोणतेही नुकसान न करता ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. यासाठी पर्यटकांना कांदळवन क्षेत्रात निवासव्यवस्था करण्यात येणार आहे. ही निवास व्यवस्था कंटेनरच्या माध्यमातून तयार करण्यात येणार. निवास व्यवस्थेच्या ठिकाणी योग्य सुरक्षात्मक उपायासाठी कुंपण, सीसीटीव्ही कॅमेरा आदी सुविधा उभारण्यात येणार आहे. तसेच जलपर्यटन, मासेमारी प्रशिक्षण, हौशी मासेमारी या क्रीडा प्रकराच्या सुविधाही यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Back to top button