रत्नागिरी: बनावट दागिने ठेवून 'बँक ऑफ इंडिया'ची २३ लाखांची फसवणूक; चौघांना अटक | पुढारी

रत्नागिरी: बनावट दागिने ठेवून 'बँक ऑफ इंडिया'ची २३ लाखांची फसवणूक; चौघांना अटक

रत्नागिरी: पुढारी वृत्तसेवा : कारवांचीवाडी येथील बँक ऑफ इंडियामध्ये बनावट दागिने ठेवून संगनमताने बँकेची सुमारे 22 लाख 80 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी 5 संशयितांपैकी बँकेच्या रजिस्टर्ड व्हॅल्युअर सोनारासह अन्य तिघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. तर एक संशयित फरार झाला आहे. फसवणुकीची ही घटना 21 जानेवारी 2019 ते 23 मार्च 2022 या कालावधीत घडली. संशयितांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत केली.

प्रदीप श्रीपाद सागवेकर (वय 51, रा. किर्तीनगर, रत्नागिरी), आकाशानी जनार्दन कांबळे (वय 50), शुभम जनार्दन कांबळे (वय 24, दोन्ही रा. रविंद्रनगर कारवांचीवाडी, रत्नागिरी), जयवंत सखाराम मयेकर (वय 49, रा. पोमेंडी बुद्रुक मयेकरवाडी, रत्नागिरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर सलीम हुसेन निंबल (रा. कोकणनगर, रत्नागिरी) याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी गुरुवारी (दि. 21) शाखा व्यवस्थापक अमिता राजेश झगडे (वय 36, रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रदीप सागवेकर बँकेत गेली 18 वर्षांपासून रजिस्टर्ड व्हॅल्युअर सोनार म्हणून काम करत आहे. त्याने सलीम निंबल, आकाशानी कांबळे, शुभम कांबळे, जयवंत मयेकर यांच्याकडील दागिने बनावट असल्याचे माहित असूनही ते सोन्याचे असल्याचे सांगून तसे प्रमाणपत्र दिले. त्याआधारे संशयितांनी संगनमताने बँकेतून एकूण 22 लाख 80 हजार 500 रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत तक्रार देताच त्यांनी 4 संशयितांना अटक केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button