सिंधुदुर्ग : संघटना ठाकरेंच्या बाजूने; केसरकरांसोबत त्यांचे जुने समर्थक; कार्यकर्त्यांचे ‘वेट अँड वॉच’ | पुढारी

सिंधुदुर्ग : संघटना ठाकरेंच्या बाजूने; केसरकरांसोबत त्यांचे जुने समर्थक; कार्यकर्त्यांचे ‘वेट अँड वॉच’

सिंधुदुर्ग; गणेश जेठे : सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मावळते पालकमंत्री उदय सामंत हे शिंदे गटात सामील झाले असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना संघटना मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने उभी असल्याची दिसते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्यापासून केसरकर यांच्यासोबत जे कार्यकर्ते होते, तेच बहुतांश कार्यकर्ते आताही त्यांच्या सोबत आहेत. उदय सामंत जोवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री होते, तोवर त्यांचा शिवसेना संघटनावाढीत सहभाग होता. मात्र शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर गेला महिनाभर ते सिंधुदुर्गात आलेले नाहीत. सध्या तरी ते आपले होमपीच असलेल्या रत्नागिरीमध्येच राजकीय मोहिमेवर आहेत. खा. विनायक राऊत आणि आ. वैभव नाईक हे ठाकरे यांच्या बाजूने असून शिवसेना संघटना आपल्या बाजूने बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

केसरकर सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते. मग त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2014 मध्ये त्यांनी शिवबंधन बांधले. शिवसेनेतून ते दुसर्‍यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. शिंदे गटाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी त्यांनी प्रभावीपणे पेलल्यामुळे शिंदे गटातील एक वजनदार नेतृत्व म्हणून ते पुढे आले आहेत. मात्र सर्वसामान्य शिवसैनिकांना व तालुका, जिल्हा पातळीवरील पदाधिकार्‍यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न अद्याप तरी केसरकरांकडून होताना दिसत नाही. किंबहुना माझ्याकडे शिवसेनेचे पदाधिकारी आले तर त्यांची पदे जातील. त्यामुळे मी त्यांना बोलावत नाही अशी भूमिका केसरकर यांनी स्पष्ट केली आहे. केसरकर यांचा वाढदिवस सोमवारी उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात केसरकरप्रेमींचा मोठा सहभाग दिसला. केसरकर यांनी शिवसेनेचे नेते खा.विनायक राऊत यांच्यावर मात्र गेले काही दिवस टीकेची झोड उठवली आहे. किंबहुना पुन्हा ‘मातोश्री’कडे जाणे शक्य नाही, असेही म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अप्रत्यक्षरीत्या ठाकरे आणि शिवसेना नेत्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट एकत्रित येईल की नाही याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.

बंडाला सुरुवात झाली तेव्हापासून रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खा. विनायक राऊत आणि कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी ‘मातोश्री’प्रति आपली निष्ठा व्यक्त करत आपण ठाकरेंच्या बाजूनेच असल्याचे स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर सिंधुदुर्गातील शिवसैनिक केसरकर यांच्या तंबूत जाऊ नयेत याचीही खबरदारी घेतली. राऊत आणि नाईक यांनी जे काही प्रयत्न केले आणि संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, संजय पडते या स्थानिक पदाधिकार्‍यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच शिवसेनेची संघटना आज तरी ठाकरे यांच्या बाजूने जोडून ठेवण्यात त्यांना यश मिळाले आहे. रत्नागिरीत उदय सामंत यांच्या बाजूने रत्नागिरीचे 20 नगरसेवक आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, कुडाळ येथे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसची सत्ता आहे. या दोन्ही ठिकाणच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी ठाकरेंसोबतच असल्याचे जाहीर केले आहे. वैभववाडी, कणकवली आणि दोडामार्गमध्ये भाजपची सत्ता आहे; तर सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण या नगरपरिषदांवर प्रशासकीय राजवट आहे.

Back to top button