रत्नागिरी : गुहागर तलाठी कार्यालय भाड्याच्या खोलीत | पुढारी

रत्नागिरी : गुहागर तलाठी कार्यालय भाड्याच्या खोलीत

गुहागर शहर ; पुढारी वृत्तसेवा :  गुहागर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पाटपन्हाळे गावातील तलाठी कार्यालयाची नूतन इमारत बांधून पूर्ण झाली आहे. मात्र, केवळ वीजजोडणी नसल्याने ही इमारत पडून असून, तलाठी सजेचा कारभार अजूनही पाटपन्हाळे येथील भाड्याच्या खोलीत सुरू आहे.

पाटपन्हाळे तलाठी कार्यालय हे एकमेव कार्यालय सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असल्याने या कार्यालयाच्या इमारतींची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी किंबहुना संपूर्ण इमारतीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे. मोडकळीस आलेल्या इमारतीची पूनर्बांधणी करण्यासाठी खात्यामार्फत निविदा काढल्या गेल्या व बांधकामही पूर्ण झाले परंतु, निविदा फक्‍त बांधकामापुरतीच असल्याने या इमारतीत वीज मीटर बसविणे व वीजजोडणी करण्यात आलेली नसल्याने यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद अद्याप झालेली नाही. या बांधकामाच्या अंदाजपत्रकामध्येच लाईट फिटिंग, मीटरचा उल्लेख नसल्यामुळे ठेकेदाराने फक्‍त बांधकाम केले आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याने लाखो रुपये खर्च करून ही सुसज्ज इमारत बांधली. मात्र, या लाखो रुपयाच्या अंदाजपत्रकामध्ये वीज जोडणी घेतली असले तर या सजेच्या कर्मचार्‍यांना अद्याप भाड्याच्या खोलीत ‘सजा’ भोगावी लागली नसती. विजेशिवाय तलाठी कार्यालयामध्ये काहीही काम होऊ शकत नाही. सर्व कारभार ऑनलाईन असल्यामुळे यासाठी संगणकांची गरज असते. पंखे आणि तत्सम उपयोगासाठी विजेची गरज असते, परंतु या कार्यालयात वीज नसल्यामुळे ही इमारत पूर्ण झाली असूनही उपयोगात येत नाही.

गेली काही वर्षे पाटपन्हाळेचे तलाठी कार्यालय भाड्याच्या खोलीत सुरू आहे. पाटपन्हाळे तलाठी नूतन इमारत ही शासकीय जागेवर आणि गुहागर-विजापूर महामार्गावरच आहे. या इमारतीच्या वीज जोडणीसाठी निधी कुठून आणायचा, हा प्रश्न महसूल विभागाला पडला
आहे.

Back to top button