गुहागर; पुढारी वृत्तसेवा : गुहागर तालुका एसटी आगाराकडे व नवीन शैक्षणिक वर्ष सुरुवात होऊन पूर्वीप्रमाणे नियमित एसटी फेर्या सुरू होत नसल्यामुळे तालुक्यातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचे होणारी गैरसोय लक्षात घेता भारतीय जनता पार्टीकडून आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले होते. तरीही या सर्व परिस्थितीचे कोणतेही गांभीर्य नसलेल्या गुहागर आगाराकडुन या विषयी कोणतीच सुधारणा होत नव्हती. यामुळे तालुक्यातील प्रवासी, विद्यार्थ्यांचे फारच गैरसोय आणि शैक्षणिक नुकसान होत होते. यासाठीच गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीने आक्रमक पवित्र घेतला.
या संदर्भात तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनानी लेखी निवेदन देऊनही गुहागर आगाराच्या कामकाजात कोणतीही सुधारणा होत नव्हती. आज सुरु केलेल्या फेर्या दुसर्या दिवशी बंद करणे, फेर्यांच्या वेळेत बदल करत असताना कोणतीही पूर्वसूचना न देणे, तालुका अंतर्गतल्या व्यवस्थेचा विचार न करता लांब पल्ल्याच्या फेर्या चालू करणे असे अनेक प्रकार आगार व्यवस्थापकांकडून केले जात होते. कारण मात्र सांगितली जात होती की टायरची उपलब्धता नाही. महामंडळाच्या फायद्याचा विचार न करता फक्त गाड्यांच्या कि.मी. वाढीकडे आगाराच्या अधिकार्यांचे लक्ष होते.
गुहागर आगाराला होणार्या अपुर्या टायरच्या पुरवठ्या करता गुहागर भाजप तालुका अध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी रत्नागीरी विभाग नियंत्रक श्री. बोरसे यांच्याकडे संपर्क करून गुहागर आगाराला तातडीने टायरचा पुरवठा करण्याची मागणी गेले चार दिवस लावून धरली होती आणि त्या मागणीला यश येत दि. 14 जुलै 2022 रोजी 36 टायरची तत्काळ व्यवस्था विभाग नियंत्रकानी केली याबद्दल भाजपाने त्यांचे आभारही व्यक्त केले. टायर आले. मात्र, टायर आवश्यक प्रक्रीयाकरुन ते गाड्याना जोडण्याकामी विजेचा खेळ खंडोबा अडथळा ठरत आहे आणि त्यामुळे आवश्यक फेर्या सोडण्यास विलंब होत असल्याचे आगार व्यवस्थापकानी कारण पुढे केले. या संदर्भातही भाजप तालुका अध्यक्ष नीलेश सुर्वे आणि सरचिटणीस सचिन ओक यांनी तत्काळ कार्यकारी अभियंता महाराष्ट्र महावितरण श्री. गलांडे यांच्याकडे संपर्क करून ही वीजव्यवस्था सुरळीत करण्यास सांगितले.
या आक्रमक पवित्र्यानंतर आगार प्रमुख कांबळे आणि वाहतूक नियंत्रक पवार यांनी भाजपाच्या आणि तालुक्यातून झालेल्या अनेकांच्या मागणीनुसार आम्ही येत्या आठ दिवसात गुहागरवासीयाना आणि विद्यार्थ्यांना आवश्यक असणार्या एसटी फेर्या नियमित आणि शाश्वतपणे सुरू करू, सुरू असणार्या काही लांब पल्ल्याच्या तोट्यात असणार्या एसटी फेर्या बंद करू जनतेच्या मागणीनुसार आवश्यक त्या नवीन फेर्यांचा सुद्धा गांभीर्याने विचार करु, असे सांगितले.
तालुक्यातील एकूण वाहतुक व्यवस्था लक्षात घेण्याकरता एसटीचे चालक आणि वाहक यांच्याकडूनही माहिती घेणार असल्याचे आगार व्यवस्थापक कांबळे यांनी सांगत दोन वर्षाच्या कोरोना कालखंडापूर्वी ज्याप्रमाणे गुहागर आगाराची वाहतूक व्यवस्था चालु होती त्याप्रमाणे ती नव्याने शाश्वतपणे सुरु ठेवण्याचा प्रामाणीकपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.
या वेळी भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, उमराठ गावचे ग्रामस्थ प्रकाश पवार, कृष्णा गोरिवले, आरे सरपंच श्रीकांत महाजन,युवा मोर्चा गुहागर शहराध्यक्ष मंदार पालशेतकर, उपाध्यक्ष हेमंत बारटक्के आदीसह बहुसंख्य भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.