पक्षप्रमुखांचे गैरसमज लवकरच दूर होतील : आ. उदय सामंत | पुढारी

पक्षप्रमुखांचे गैरसमज लवकरच दूर होतील : आ. उदय सामंत

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  मी आजही शिवसेनेतच आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना बळकट करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आज मला भेटलेल्या 100 टक्के शिवसैनिकांनी मी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. जि. प.च्या तीन गटांतील शिवसैनिकांची गर्दी पहाता टीकाकारांनी बोध घ्यावा, असा सल्ला आ. सामंत यांनी शिवसेना पदाधिकार्‍यांना दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिंदे गटाबद्दल झालेले गैरसमज येत्या तीन-चार महिन्यात दूर होतील, असा विश्‍वास मुख्यमंत्री गटाचे शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी व्यक्‍त केला आहे.                                                                                                                        सर्वसामान्य शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री व्हावा, हे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे स्वप्न होते. त्या मोहिमेत सहभागी मी झालो. याचा मला गर्व असल्याचे आ.उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शिवसेनेतील आमदारांच्या एका मोठ्या गटाने शिवसेना वाचविण्यासाठी उठाव केला. त्याकाळात मी शिवसेनेसोबतच होतो. त्यावेळी झालेल्या विविध बैठकीत गेलेल्या आमदारांना सोबत ठेवण्यासाठी मी प्रयत्न केले. शिवसेना एकसंघ राहावी यासाठी मी केलेले प्रयत्न अपुरे ठरले. शिंदे गटाशी चर्चा करण्याची कोणाचीही तयारी त्यावेळी दिसत नव्हती. मी जोडणारा आहे, तोडणार नाही. त्यामुळे जर दूर गेलेत, त्यांना जोडण्याची भूमिका कोणाचेही नव्हती. त्यामुळे मला अखेरच्या क्षणी शिंदे गटात जावे लागले असे आ. सामंत यांनी सांगितले.

शिवसेनेचा शिंदे गट,भाजपाचे सरकार आल्यानंतर मी प्रथमच मतदार संघात आलो. त्यावेळी माझे शिवसैनिकांनी स्वागत केले. आज वाटद, हातखंबा, खाडीपट्टा या तीन जिल्हा परिषद गटातील शिवसैनिकांनी माझ्याकडे वेळ मागितली होती. आज त्यांची गर्दी सर्वांना पहायला मिळाली आहे. त्यामुळे शिवसैनिक माझ्या सोबतच आहेत. मी आजही शिवसैनिक असल्याचे कार्यकर्त्यांना स्पष्ट केले आहे. मी शिंदे गटात सहभागी असलो तरी मी मतदार संघात शिवसेनेचाच म्हणून काम करत असल्याचे आ.सामंत यांनी सांगितले.
आपण शिंदे गटात सहभागी झाल्यामुळे मतदार संघातील काही शिवसेना पदाधिकार्‍यांना आनंद झाला आहे. आता उदय सामंत राजकारणातून संपले अशी त्यांची धारणा आहे. आता शिवसेनेत आपल्याला अधिक जागा मिळेल या भावनेतून ते टिका करत असल्याचा टोला आ.सामंत यांनी लगावला.

पूर्वीच्या सरकारमध्ये घटक पक्ष शिवसेनेला त्रास देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नव्या मंत्री मंडणात तात्काण निर्णय होत आहे. काम करताना असे समाधन मिळणे आवश्यक होते. ते आता मिळत आहे. रत्नागिरीत जिल्ह्यासाठी वैद्यकिय महाविद्यालय मंजूर झाले आहे. पुढील वर्षी प्रवेश प्रक्रिया सुरु होईल. तर विधी महाविद्यालयाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्याचे आ. सामंत यांनी सांगितले.

राज्यातील नागरिकांचे मनोरंजन सुरु
शिंदे गटाचे प्रवक्ते आ.दिपक केसरकर व भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांच्यात वाद सुरु आहे. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, आ. सामंत म्हणाले, राज्यातील राजकीय घडामोडींमुळे वातावरण तप्त आहे. अशा वेळी राज्यातील नागरिकांना विरंगुळा हवा आहे. त्यासाठीचे त्यांचे मनोरंजन सुरु असल्याचा टोला आ. सामंत यांनी दोघांनाही लगावला आहे.

मी शिंदे गटात गेलो, तरी खासदार विनायक राऊत यांना तुमच्या संपर्क कार्यालयात तुमचे काम सुरु ठेवा, असा मी निरोप जिल्हा प्रमुख विलास चाळके यांना दिला होता. मी खासदार विनायक राऊत यांना कार्यालय खाली करण्याची सुचना केली नव्हती. त्यांनी माझ्यावर कितीही टीका केली तरी त्यांचा फोटो आजही माझ्या पालीतील कार्यालयात आहे. तो मी काढणार नसल्याचे आ.सामंत यांनी सांगितले.
खा. विनायक राऊत यांनी केलेल्या टिकेला मी काय उत्तर देणार . ते माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत. त्यांचे कर्तृत्व खूप मोठे असून ते जागतिक पातळीवरचे नेते असल्याची टीका आ. उदय सामंत यांनी केली.

Back to top button