रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा: जिल्हा प्रशासनाने आपत्तीची माहिती देण्यासाठी तयार केलेली 'चॅटबोट' या प्रणालीवर घरबसल्या किंवा अगदी प्रवासा दरम्यानही अद्ययावत माहिती मिळत असल्याने नागरिकांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे. मागील पाच दिवसात तब्बल सव्वालाखाहून अधिक नागरिकांनी चॅटबोटचा वापर माहिती मिळवण्यासाठी केला आहे. स्थानिकांनाच नव्हे तर जिल्ह्याबाहेर, अन्य राज्यात आणि देशाबाहेर राहणार्या रत्नागिरीवासियांना आपल्या भागातील आपत्तीची माहिती एका क्लिकवर मिळत आहे.
गेल्या पाच दिवसात एक लाख तीस हजार 377 नागरिकांनी चॅटबोटचा वापर करुन जिल्ह्यातील आपत्ती विषयक माहिती घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्था विषयी पर्जन्यमान, नद्यांची पातळी, भरती- ओहोटी वेळापत्रक, महत्त्वाचे संदेश, रस्ते वाहतूक, रस्त्यावर दरड कोसळली असल्यास पर्यायी मार्ग इत्यादी बाबत अद्यावत माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. या प्रणालीचा वापर रत्नागिरी जिल्ह्यातून प्रवास करतानाही पर्यटकांना होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्जन्यमान, रस्ते याबाबत माहिती मिळणार असून प्रवासासाठी योग्य नियोजन करता येणार आहे.
एखाद्या ठिकाणी दुर्घटना घडल्यास प्रशासनाला तातडीने त्या भागात हालचाल करणे व मदत पोहचवणे शक्य होणार आहे. चॅटबोट प्रणालीचा शुभारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चौवीस तासात तब्बल 22 हजारजणांनी यावर माहिती घेण्यासाठी वापर केला. त्यामुळे ही यंत्रणा कोलमडली होती. सुमारे 18 हजारजणांना माहिती देता येईल अशी व्यवस्था करण्यात आली होती. परंतु अपेक्षापेक्षा अधिक लोकांनी याचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यानंतर या प्रणालीची क्षमता वाढवण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ.बी. एन. पाटील यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आलेली ही प्रणाली तयार करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी विशेष मेहनत घेतली.
राज्यासह देशभरात प्रथमच 'चॅटबोट'चा वापर आपत्कालीन स्थितीची माहिती घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात आला आहे. या प्रणालीला मिळणारा प्रतिसाद पाहता राज्यात व देशात नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. विशेषत: दरवर्षी ज्या जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन स्थिती निर्माण होते. त्याठिकाणी याला अधिक महत्व येणार आहे. चॅटबोट प्रणालीचा जिल्ह्यातील वापर हा पथदर्शी प्रकल्प ठरत आहे.
शेतकर्यांसाठी प्रणाली उपयुक्त ठरणार
आपत्कालीन परिस्थितीत दूरध्वनी, मोबाईल क्रमांक न लागणे किंवा अन्य कारणांमुळे माहिती मिळत नाही. अशा वेळी मोबाईलवर चॅटबोटद्वारे विविध प्रकारची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. या प्रणालीच्या मदतीने प्रत्येक नागरिकास केवळ पर्जन्यमान नव्हे तर नदी पाणी पातळी, वेधशाळेतर्फे जारी सूचना, जिल्ह्याबाबत जारी विशेष सूचना, आपतकालीन स्थितीत संपर्क करावयाचे क्रमांक, रस्ते व वाहतूक याबाबत माहिती मिळणार आहे. भविष्यात शेतकर्यांनाही या प्रणालीचा वापर होणार आहे
7387492156 या व्हॉटसअॅप क्रमांकावर 'हाय' पाठवल्यावर खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात.
आर 1- पर्जन्यमान
आर 2- नदी पाणी पातळी अहवाल
आर 3 – वेधशाळा सूचना
आर 4 -विशेष सूचना
आर 5- आपत्कालीन संपर्क क्रमांक
आर 6-रस्ते वाहतूक
आर 7- महत्वाचे संदेश
यातील आपल्याला आवश्यक माहिती मागवल्यावर, त्याची क्षणार्धात माहिती प्रशासनाकडून देण्यात येते.