रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा: गेले दोन दिवस कोकणात पावसाचा जोर वाढला. आगामी दोन दिवस कोकण किनारपट्टीतील पालघर, रायगड आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता असल्याने हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने 'रेड अलर्ट' जारी केला तर मुंबईसह ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. कोकणातील काही भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, अरबी सागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने आगामी दोन दिवस रत्नागिरीसह रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. किनारी भागात ताशी 40 ते 60 कि.मी. वेगाने वारे वाहणार असल्याने किनारी भागासह दुर्गम भागातही सावधगिरी बाळगण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.
गेला आठवड्यात पावसाचे सातत्य होते. गेले तीन दिवस पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात दमदार वाटचाल केली. त्यामुळे खरीप क्षेत्रात पेरणीची कामे पूर्ण झाली असून काही भागात तांत्रिक त्रुटीने पेरणी रखडली आहे. मात्र, पावसाने दमदार समाधानकारक सातत्य ठेवल्याने येत्या दोन दिवसात. रखडलेल्या पेरण्याही पूर्ण होतील. पेरण्यांचा उरक झाल्याने आता शेतकर्यांनी लावणीची जळवाजुळव सुरू केली आहे. बुधवारी संपलेल्या 24 तासात 61 मि. मी. च्या सरासरीने साडेपाचशे मि.मी. पाऊस झाला.
यामध्ये लांजा, खेड आणि चिपळूण तालुक्यात 100 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला. मंडणगड तालुक्यात 70 मि. मी. , दापोली 30, गुहागर 14, संगमेश्वर 45, रत्नागिरी 37 आणि राजापूर तालुक्यात 62 मि.मी. पावसाची नोंद झाली. खेड तालुक्यात जगबुडी नदीचे पात्र अद्यापही इशारा पातळीकडे झेपावलेले असल्याने नदी परिसरातील गावाबरोबर खेड शहरासह बाजारपेठेत आपत्ती निवारण पथकाने सतर्कता आहे. तशा सूचनाही प्रशासनाने यंत्रणेला दिल्या आहेत. जिल्ह्यातील अन्य नद्यांमधील धोकादायक जलस्तर आता ओसरला असला तरी संभाव्य पूरस्थितीवर प्रशासनाने करडी नजर ठेवले.
नदी इशारा नदी इशारा पातळी जलस्तर
जगबुडी 5 6.35
वाशिष्ठी 5 3.80
शास्त्री 6.20 5
सोनवी 7.20 4.80
काजळी 16.50 14.43
कोदवली 4.90 4.80
मुचकुंदी 3.50 2
बावनदी 9.40 7.10