सिंधुदुर्ग : मद्यधुंद पर्यटकाकडून एसटी चालकास मारहाण; आंबोली घाटातील प्रकार | पुढारी

सिंधुदुर्ग : मद्यधुंद पर्यटकाकडून एसटी चालकास मारहाण; आंबोली घाटातील प्रकार

सावंतवाडी; पुढारी वृत्तसेवा : मद्यधुंद अवस्थेतील पर्यटकाकडून सावंतवाडी एसटी डेपोच्या बस चालकाला चालत्या गाडीतून खेचून रस्त्यावर काढून बेदम मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी 2.30 वाजता आंबोली घाटात मुख्य धबधबा परिसरात घडला. यात चालकाचा पाय फ्रॅक्चर झाला असून चालक विक्रम सुरेश पाटील (रा. तारेवाडी गडहिंग्लज) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माझ इलियाज गोलंदाज (22, रा. बेळगाव, चिकोडी) याच्यावर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चालक विक्रम पाटील हे सावंतवाडी-नृरसिंहवाडी एसटी घेऊन आंबोली घाटातून जात असताना मुख्य धबधबा परिसरात एसटी वाहतूक कोंडीत अडकली होती. यावेळी बेळगाव येथील काही पर्यटकाकडून मद्यधुंद अवस्थेत गाडीवर हाताने मारून आवाज करण्याचे प्रकार सुरू होते. याबाबत काही प्रवाशांनी या पर्यटकांना जाब विचारला असता त्याचा राग घेऊन माझ या मद्यधुंद युवकाने बस चालू असताना चालक श्री. पाटील याचे दोन्ही पाय खेचून रस्त्यावर पाडले. यात चालकाच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून पाय फ्रॅक्चर झाला आहे. प्रसंगावधान दाखवून चालकाने हॅन्ड ब्रेक ओढल्याने गाडीवर नियंत्रण मिळवता आले अन्यथा मागच्या गाड्यांना अपघात होऊन मोठा अनर्थ झाला असता.

झालेला प्रकार समजताच घटनास्थळी आंबोली दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित गोते यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत मद्यधुंद पर्यटकांना ताब्यात घेतले. तसेच जखमी एसटी चालकाला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविले. चालक पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सरकारी कर्मचार्‍यावर हल्ला व सरकारी काम करण्यापासून परावृत्त केल्याप्रकरणी माझया युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मारहाण करणार्‍या युवकासह त्याच्यासोबत असलेल्या अन्य काही युवकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

Back to top button