आ. दीपक केसरकर, उदय सामंत विश्‍वासघातकी! खा. विनायक राऊत : जिल्ह्यात शिवसेना भक्‍कम | पुढारी

आ. दीपक केसरकर, उदय सामंत विश्‍वासघातकी! खा. विनायक राऊत : जिल्ह्यात शिवसेना भक्‍कम

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील शिवसैनिक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे पाठीशी उभे आहेत. आ. वैभव नाईक हे शिवसेनेशी एकनिष्ठ व प्रामाणिक राहिले. मात्र, आ. दीपक केसरकर व माजी पालकमंत्री तथा आ. उदय सामंत यांनी विश्‍वासघात केला. जे विकाऊ होते, ते शिंदे गटासोबत गेले. त्यांची पर्वा करण्याचे कारण नाही. आ. केसरकर यांना मंत्री करण्यात माझा सिंहाचा वाटा होता, हे त्यांनी विसरू नये. जिल्ह्यात शिवसेना संघटना भक्‍कम असून, भविष्यात आ. वैभव नाईक यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद निश्‍चितच मिळेल, असा विश्‍वास शिवसेनेचे सचिव, संसदीय गटनेते तथा खा. विनायक राऊत यांनी व्यक्‍त केला. यावेळी त्यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांसह भाजपावर निशाणा साधला.

शिवसेनेत घडलेल्या वेगवान घडामोडीनंतर खासदार विनायक राऊत, गुरुवारपासून जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा पूर्ण करून आपण सिंधुदुर्ग दौर्‍यावर आलो आहे. दोन्ही जिल्ह्यात शिवसेना पक्ष संघटना मजबूत आहे. आतापर्यंत अनेक संकटे आली, पण शिवसेना भक्‍कमपणे उभी राहिली आहे. नारायण राणे यांच्या बंडानंतर आ. वैभव नाईक यांनी आमने-सामने केले. त्यावेळी शिवसैनिकांनी पोलिसांच्या लाठ्या झेलल्या. मात्र, शिवसेना भक्‍कमपणे उभी राहिली. आताही जे विकाऊ होते ते गेले. त्यांची पर्वा करण्याचे कारण नाही.

जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक शिवसेना व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. ज्याप्रमाणे आमदार वैभव नाईक यांच्यावर विश्‍वास होता तेवढाच विश्‍वास आमदार दीपक केसरकर व उदय सामंत यांच्यावर होता. मात्र, आ.नाईक शिवसेनेशी प्रामाणिक राहिले. केसरकर व सामंत यांनी विश्‍वासघात केला. पक्षप्रमुख ठाकरे यांचा विश्‍वासघात करून शिंदेसोबत गेलेल्या बंडखोर आमदारांना धडा शिकविण्यासाठी राज्यातील शिवसैनिक सज्ज झाला आहे, असे खा. राऊत म्हणाले. उदय सामंत यांच्यासोबत सिंधुदुर्गातील एकही शिवसैनिक गेलेला नाही. आ. वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर, गौरीशंकर खोत, संजय पडते, दत्ता दळवी, जान्हवी सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिवसैनिक पक्ष संघटना अधिक भक्‍कम करण्यासाठी कामाला लागले आहेत, असेही खा. राऊत यांनी यावेळी सांगितले.

Back to top button