शिवसेनेतील फुटीच्या भेगा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातील रामदास कदमांच्या गुहागर-खेडपर्यंत सुरूवातीला पोहोचल्या होत्या. तळकोकण अभेद्य राहील असा अंदाज होता. परंतु एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडाचा तडाखा इतका वर्मी बसला आहे की हीच भेग पार सावंतवाडीपर्यंत विस्तारली गेली आहे. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर सुरूवातीला गुवाहाटीला पोहोचले आणि पाठोपाठ पालकमंत्री उदय सामंत यांनीही गुवाहाटीत जावून शिंदेंची गळाभेट घेतली आहे. अकल्पित, अविश्वसनीय अशी उभी फूट शिवसेनेमध्ये पडली आहे. तांत्रिक मुद्दे काहीही असोत, शिवसेनाच 'हायजॅक' केली गेली की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तळकोकणात मान्सूनची धामधूम सुरू आहे. शेतकर्याच्या हातात नांगर दिसतो आहे आणि दुसरीकडे तोच शेतकरी गुवाहाटी आणि मुंबईतील राजकीय डावपेचांकडे लक्ष ठेवून आहे. शिवसेना वाचविण्याची धडपड मुंबईत तर बंडखोर आमदारांची संख्या आणखी-आणखी वाढविण्याची रणनीती गुवाहाटीत सुरू आहे.
अगदी तशीच धडपड तळकोकणातील सिंधुदुर्गात सुरू आहे. सुरूवातीला दीपक केसरकर 'वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होते. शिवसेनेच्या बैठकांमध्ये त्यांचा सहभागही होता. परंतु भाजपशी संगत करावी अशी मागणी करत त्यांनी शिंदेंकडे जाण्याचे संकेत दिले होते. शिवसेनेने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यावर परखड टीका करून केसरकर यांनी आपला गुवाहाटीचा मार्ग अधिक मोकळा केला. अखेर ते तिथे पोहोचले, शिंदेंच्या बाजूला बसले आणि विशेष म्हणजे ते शिंदे गटाचे प्रवक्तेही बनले आहेत. आक्रमकपणे त्यांनी मिडियाशी संवाद सुरू केला आहे. शिंदे गटाची बाजू ते स्पष्टपणे मांडत आहेत.
इकडे सिंधुुदुर्ग जिल्ह्यात मात्र त्यांना अपेक्षेप्रमाणे शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. शनिवारी केसरकर यांच्या सावंतवाडी येथील कार्यालयावर दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला. तिथे असलेल्या पोलिसांनी दगडफेक करणार्यांना ताब्यात घेतले. सिंधुदुर्गातील शिवसैनिक एकवटले आहेत. कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मात्र सुरूवातीपासूनच उध्दव ठाकरे यांच्याप्रती निष्ठा जाहीर केली आहे. शेवटचा आमदार राहिला तरीही मी ठाकरे यांच्याच सोबत राहणार असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले आहे. 'मातोश्री' हेच आपले घर अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. म्हणूनच मुंबईतून सिंधुदुर्गात आलेल्या वैभव नाईक यांना शिवसैनिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले, मिरवणूक काढली, ढोलताशांचा गजर केला. कणकवली, कुडाळ, मालवण आणि सावंतवाडीत 'शिवसेना झिंदाबाद'चा आवाज घुमला. 'शिवसेनेचा वाघ' म्हणून वैभव नाईक यांचा गौरव शिवसैनिकांनी केला.
शिवसेनेचे स्थानिक नेते संदेश पारकर यांनी तर बंडखोरांविरोधात उभ्या ठाकलेल्या शिवसेनेच्या फळीला नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला आहे. संदेश पारकर, संजय पडते जिल्हाभर फिरून ठाकरेंच्या बाजूने शिवसेनेला एकवटत आहेत. सतीश सावंतही ठाकरेंच्या बाजूने आहेत. सध्या तरी बहुतांश शिवसैनिक ठाकरेंप्रती निष्ठा व्यक्त करत आहेत. अगदी केसरकर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या शिवसेनेच्या जान्हवी सावंत, सुकन्या नरसुले या महिला पदाधिकारी होत्या. आता त्या ठाकरे यांच्या बाजूने आहेत. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री प्रवीण भोसले यांनी तर केसरकर यांच्यावर घणाघात केला आहे. 'केसरकर यांचा इतिहास विश्वासघाताचा' असे कडवे उद्गार भोसलेंनी काढले आहेत. डॉ. जयेंद्र परूळेकर यांनीही केसरकर यांच्यावर टीका केली आहे. केसरकर प्रवक्ते या नात्याने गुवाहाटीतून बोलत आहेत खरे पण पुढे काय?…
पुढे काय होणार? हा एकच प्रश्न सध्या लोकांमध्ये आहे. केसरकर जेव्हा प्रत्यक्षात सिंधुदुर्गात येतील त्यावेळी त्यांच्यासोबत कोण कोण असेल? केसरकर सुरूवातीला काँग्रेसमध्ये होते. मग ते राष्ट्रवादीत प्रवेशले. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत राणे यांना विरोध करत त्यांनी राष्ट्रवादीतून बंड केले. उध्दव ठाकरे यांनी स्वतः सावंतवाडीत येऊन त्यांना शिवबंधन बांधले. त्यानंतर दोनवेळा ते शिवसेनेचे आमदार होते. मध्यंतरी मंत्रीदेखील झाले. आता ते तेच शिवबंधन घेऊन गुवाहाटीला पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे सत्तेत राहिले तर दीपक केसरकर मंत्रिमंडळात असतील हे निश्चित मानले जात आहे. अर्थात त्यांच्याकडे सिंधुदुर्गाचे पुन्हा एकदा पाकलत्व येऊ शकते. परंतु पुढच्या 15-20 दिवसात काय घडेल? याचा नेम सध्या तरी नाही. दिल्लीत काय घडेल? न्यायालयामध्ये काय होईल? गुवाहाटीत कोणता निर्णय होईल? इकडे मुंबई आणि विधिमंडळात काय-काय घडेल? त्यावरच पुढे काय होणार? या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे. त्याचवेळी केसरकर हेही कोणत्या भूमिकेत असतील ठरू शकेल. खरेतर त्यानंतरच केसरकर यांच्याबाजूने कोण उभे असतील तेही दिसेल.
तोवर जो-तो परिस्थितीचा अंदाज घेतो आहे आणि सावध पवित्र्यातही आहे. केसरकर यांच्यासोबत राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले त्यांचे अनेक समर्थक त्यांच्यासोबत राहतील असा अंदाज आहे. म्हणूनच तर सोमवारच्या सावंतवाडीतील शिवसेनेच्या रॅलीत अशोक दळवी, अनारोजीन लोबो ही केसरकर समर्थक मंडळी सहभागी नव्हती. रूपेश राऊळ, चंद्रकांत कासार, विक्रांत सावंत यांचा मात्र रॅलीत पुढाकार होता. या रॅलीतील आक्रमकपणा आणि शिवसैनिकांचा रोष केसरकर यांच्यावर दिसत होता. हेही खरे आहे की, परिस्थिती निवळल्यानंतर आणि केसरकर जिल्ह्यात आल्यानंतर सध्यापेक्षा परिस्थिती वेगळी असू शकेल. नेमके केसरकर यांच्या बाजूने कोण राहणार? आणि त्यांच्या विरोधात कोण जाणार? हेही नेमकेपणाने तेव्हाच स्पष्ट होईल.
खासदार विनायक राऊत यांनी मात्र अपेक्षेप्रमाणे शिवसेनेशी निष्ठा कायम ठेवली आहे. ते सध्या मुंबईत शिवसेनेच्या मेळाव्यांमध्ये सहभागी आहेत. ते सिंधुदुर्गात जेव्हा येतील तेव्हा त्यांचेही शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत होईल असे वाटते. शिवसैनिक त्यांची वाट पाहत आहेत. असे सर्वांनाच वाटले होते, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत उध्दव ठाकरेंसोबत राहतील, अगदी राजभवनात जाईपर्यंत ते ठाकरेंसोबत होते. परंतु तेही जेव्हा गुवाहाटीतील रेडीसन ब्ल्यू हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा तळकोकणातल्या शिवसेनेला धक्काच बसला. रत्नागिरीचे आमदार असलेल्या सामंतांवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग शिवसेनेची बर्यापैकी मदार होती. रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्गातही शिवसेनेची जिल्हा परिषदेवर सत्ता आणण्याचा त्यांचा मनोदय होता. सिंधुदुर्गातील शिवसेनेला 'ताकद' पुरवण्याचे काम त्यांनी आपल्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात केले.
राष्ट्रपती राजवट लागणार का? की एकनाथ शिंदे यांना घेऊन भाजप सत्तेवर येईल? की शिंदे गटाला बाहेरून पाठिंबा देऊन भाजप ठाकरेंना मुख्यमंत्री पदापासून दूर करेल? हे सर्व काही स्पष्ट व्हायला वेळ लागणार आहे. त्यानंतरच अडीच वर्षांनी पुन्हा निवडणुका होतील तेव्हा कोण जिंकेल आणि कोण पराभूत होईल यांचा अंदाज बांधावा लागेल. सध्याचा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक तास नवनवीन घटना घेऊन समोर येतो आहे. त्यातूनच अंदाज बांधण्याची प्रत्येकाची धडपड सुरू आहे. सध्या तरी सिंधुदुर्गचे पालकमंत्री गुवाहाटीत आहेत. ते सिंधुदुर्गात केव्हा परततील? परततील तेव्हा ते पालकमंत्री असतील का? की दीपक केसरकर पालकमंत्री म्हणून प्रवेशतील? जसा केसरकर यांच्या कार्यालयावर दगड मारताना नेम चुकला तसाच कोणत्याही अंदाजाचा नेम चुकू शकतो, अशी सद्यस्थिती आहे.
भाजप आणि राणे यांच्या विरोधात सिंधुदुर्गातील शिवसेनेने नेहमी रणनीती आखली. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला खिंडार पडले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे वर्चस्व असले तरीदेखील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये गेल्या काही वर्षात शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे. केंद्रात सत्ता असलेल्या भाजपची ताकद रोखण्यासाठी स्थानिक शिवसेना नेते राज्यातील सत्तेचा वापर करत होते. आता हीच सत्ता अडचणीत आल्यामुळे शिवसेनेसमोर संकट उभे राहिले आहे. या संकटाचे नेमके परिणाम काय असतील हे कळण्यास आणखी काही दिवस जावे लागणार आहेत. सध्यातरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मात्र आमचे सरकार सत्तेवर येईल असे म्हटले आहे. उदय सामंत गुवाहाटीत पोहोचले आणि इकडे कणकवलीत भाजपने फटाके फोडले. या सर्व घडामोडीत काय सांगावे, भाजपही अलगद सत्तेवर येऊ शकते. अर्थात कणकवलीचे आमदार नितेश राणे मंत्री होऊ शकतात. देखते है…आगे आगे होता है क्या?
गणेश जेठे