कोकण : बिबट्याचा घरात घुसून वृद्धेवर हल्ला | पुढारी

कोकण : बिबट्याचा घरात घुसून वृद्धेवर हल्ला

साडवली , पुढारी वृत्तसेवा :   बिबट्याने घरात शिरून वृद्ध महिलेवर हल्ला केल्याची खळबळजनक घटना संगमेश्‍वर तालुक्यातील कुळ्ये वाशी येथे सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धा गंभीर जखमी झाली आहे. कलावती काशिराम कुळ्ये (75) असे बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वृद्धेचे नाव आहे. या महिलेने प्रसंगावधान राखत घराबाहेर पडत बिबट्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. महिलेच्या या धाडसाचे ग्रामस्थांमधून कौतुक होत येत आहे. तर पुढील व मागील असे दोन्ही दरवाजे कडीच्या सहाय्याने बंद करून घेत या आजीने बिबट्याला घरातच कोंडून ठेवले.

या बाबत देवरुख वन विभागाकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, श्रीमती कलावती कुळ्ये या आपल्या घरामध्ये रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून झोपल्या असताना घराचा मागील दरवाजा उघडा असल्याने या दरवाजातून बिबट्याने मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास घरात प्रवेश केला. याचवेळी घरातील कोंबड्यांनी ओरडायला सुरुवात केली. कोंबड्या ओरडत असल्याच्या आवाजाने कलावती यांना जाग आली. या नंतर त्या कोंबड्या का ओरडत आहेत हे बघण्यासाठी गेल्या असता घरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला.

बिबट्याने केलेल्या अचानक हल्ल्याने कलावती या पुरत्या घाबरून गेल्या. मात्र उद्भवलेल्या  प्रसंगाला धिराने तोंड देत त्यांनी वेळीच घराबाहेर पडत बिबट्याच्या हल्ल्यातून आपला जीव वाचवला. घराबाहेर पडताच त्यांनी दोन्ही दरवाज्यांना बाहेरून कडी लावून बिबट्याला घरातच कोंडले. मात्र तोपर्यत बिबट्याच्या हल्ल्यात कलावती या गंभीर जखमी झाल्या होत्या.

घराबाहेर पडताच कलावती यांनी आरडाओरडा केला. यावेळी आजुबाजूचे ग्रामस्थ धावत आले. सुरेश गंगाराम खांडेकर, शांताराम करंडे, प्रतीभा बोल्ये यांनी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कलावती यांना तत्काळ उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.

या घटनेची माहिती गावचे पोलिस पाटील श्री. इंदुलकर यांनी देवरूख वनविभागाला दिली. यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी विभागीय वनाधिकारी दीपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूखचे वनपाल तौफिक मुल्ला, वनरक्षक न्हानू गावडे, सुरज तेली, आकाश कडूकर, संजय रणधीर यांनी घटनास्थळी पिंजर्‍यासह धाव घेतली व पंचनामा केला. या नंतर सरपंच, पोलिस पाटील व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पिंजर्‍यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

या बिबट्याचे वय अंदाजे सात वर्षे असून तो नर जातीचा आहे. पशुवैद्यकीय अधिकारी, देवरुख यांच्याकडून या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून  तो सुस्थितीत असल्याची खात्री होताच त्याला वन विभागाकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हा बिबट्या भक्षासाठी कोंबड्यांच्या वासाने घरात शिरला असावा, असा अंदाज वनपाल तौफिक मुल्ला यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कलावती कुळ्ये यांना औषधे उपचारासाठी देय असलेली रक्कम शासनाच्यावतीने देण्यात येईल, असे वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार यांनी सांगितले.

Back to top button