वेंगुर्ले : कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्कची कारवाई संशयास्पद | पुढारी

वेंगुर्ले : कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्कची कारवाई संशयास्पद

वेंगुर्ले : पुढारी वृत्तसेवा; होडावडा येथे राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून मोठा दारू साठा जप्त केला. यासंदर्भात संशयीत वेंगुर्ले येथील मांजरेकर नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला व त्याला फरार घोषित करण्यात आले. उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर पथकाकडून करण्यात आलेली कारवाई संशयास्पद असून वरिष्ठ स्तरावरुन चौकशी करावी. या प्रकरणात तेथील काजू फॅक्टरीचे मालक व वेंगुर्ले नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तुषार सापळे यांचा हात असल्याचा आरोप जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केला असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वेंगुर्ले तालुका भाजपातर्फे पोलिसांकडे करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

वेंगुर्ले भाजपा कार्यालय झालेल्या पत्रकार परिषदेला तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, प्रितेश राऊळ,बाबली वायंगणकर,शीतल आंगचेकर, कृपा गिरप – मोंडकर, दादा केळुस्कर, नितीन चव्हाण, ज्ञानेश्वर केळजी, वसंत तांडेल आदी उपस्थित होते. दळवी म्हणाले,ज्या ठिकाणी छापा टाकला त्या काजू फॅक्टरीचे मालक, न. प. मध्ये दोनवेळा नगरसेवक राहिलेले शिवसेनेचे पदाधिकारी आहेत.त्यांनी काजूप्रक्रियेसाठी गोडावून बांधलेले आहे.

भरारी पथकाने येथे दारूसाठा जप्त केल्यानंतर सापळे यांनी आपला काजू कारखाना बंद असल्याचे व गोडावून भाड्याने दिले असल्याचे सांगितले.भाड्याने दिल्याची गोष्ट पूर्णतः खोटी असून कारखाना सुरू आहे. तसेच गोडाऊनचाही भाडेकरार झालेला नाही. होडावडा ग्रा. पं. वर शिवसेनेची सत्ता आहे. तुषार सापळे हेही शिवसेनेचे असल्याने संगनमताने कोणतीही परवानगी न घेता गोडाऊनचे बांधकाम झाले आहे. सापळे यांच्या संमतीने व त्यांच्या माध्यमातूनच हा व्यवसाय सुरू होता. मात्र त्यांचे नाव या प्रकरणात येऊ नये यासाठी शिवसेनेच्या जिल्ह्यातील कोणत्या व्यक्तीने कोल्हापूर येथे सेटिंग लावले, कुठल्या नेत्याने दबाव आणला याची माहिती आमच्याकडे आहे. योग्यवेळी ती आम्ही उघड करू,असा इशारा श्री.दळवी यांनी दिला.

Back to top button