तिवरे धरण फुटीला जबाबदार असणार्‍यांना अभय : नीलेश राणे

तिवरे धरण फुटीला जबाबदार असणार्‍यांना अभय : नीलेश राणे
Published on
Updated on

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : तिवरे धरण दुर्घटनेस कारणीभूत असलेल्या तत्कालीन ठेकेदारासह अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना एसआयटीने दिल्या आहेत. मात्र, सरकारने धरणाचा संबंधित ठेकेदार आणि अधिकार्‍यांना अभय दिले आहे. या प्रकरणात जर दोषींवर गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा माजी खासदार तथा भाजपा प्रदेश चिटणीस नीलेश राणे यांनी दिला आहे.

सह्याद्रीच्या खोर्‍यात वसलेल्या तिवरे येथील धरण फुटीची भीषण दुर्घटना 2 जुलै 2019 रोजी घडली होती. या घटनेत 23 जणांचा हकनाक बळी गेला होता. तसेच जनावरेही वाहून गेल्याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले होते. एक वाडी उद्ध्वस्त झाली होती. या घटनेतून तिवरेवासीय अद्यापही सावरलेले नाहीत तसेच तिवरे धरणाच्या पुनर्बांधणीच्या प्रश्नदेखील खितपत पडला आहे. सुरुवातीला या दुर्घटनेच्या चौकशीसाठी विशेष चौकशी समिती नेमली होती. मात्र, चौकशी अहवाल समोर येत नव्हता. त्यामुळे दोषींवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात होता. दरम्यान, माजी खासदार व भाजपा प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांनी चिपळुणात पत्रकार परिषद घेऊन तिवरे धरण फुटी प्रकरणी दोषींवर कारवाई करावी. अन्यथा न्यायालयात दाद मागू, असा इशारा दिला होता.

तिवरे धारण फुटीच्या घटनेला तीन वर्षे होत आली. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी दोन वेळा विशेष चौकशी समिती नेमली होती. त्यात काही आक्षेप नोंदवले गेल्याने पुनर्विलोकन समिती गठित केली होती. ती नेमकं काय करत होती हे त्यांनाच माहिती. जलसंधारण विभागाने सांगितलं आहे की, पुनर्विलोकन समितीच्या सूचनेनुसार संबंधित तत्कालीन ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. दोषी अधिकार्‍यांवर चौकशी करून कारवाई करावी, असे नमूद केले आहे.

या प्रकरणी डिसेंबर 2021 मध्ये आरटीआयमधून ही माहिती समोर आली आहे. हे आदेश होऊन आता सात महिने झाले आहेत. मात्र, सरकार कारवाई करत नाही. तिवरे धरणफुटी प्रकरणी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी आम्ही लावून धरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठेकेदार कंपनी ब्लॅकलिस्ट केलेली नाही

शिवसेनेचे माजी आ. सदानंद चव्हाण यांची कंपनी या धरणाचे ठेकेदार होती. दुर्दैवी घटनेनंतरही अद्याप ही कंपनी ब्लॅकलिस्ट केलेली नाही. कोणत्याही अधिकार्‍यांना कसलेही समन्स नाही. त्यामुळे सरकारकडून या लोकांना अभय देण्याचं काम सुरू आहे. पण असं काही महाराष्ट्रात चालू देणार नाही. त्यामुळे सगळ्या दोषींवर कारवाई होऊन शिक्षा झालीच पाहिजे. त्यांच्यावर क्रिमिनल प्रोसिडींग झालीच पाहिजे ही आमची मागणी शेवटपर्यंत राहील आणि दोषींना शिक्षा होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही असे, नीलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news