

वैभववाडी; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एप्रिल महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या दरोडाप्रकरणी वैभववाडी पोलिसांनी गुजरात-नवसारी जेल येथून मध्य प्रदेशमधील सात सराईत चोरट्यांना ताब्यात घेतले. बुधवारी ही कारवाई केली. हे सर्व सदस्य कुख्यात चड्डी-बनियन गँगचे सदस्य आहेत. त्यांना गुरुवारी कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. एप्रिल महिन्यात एकापाठोपाठ एक आधी वैभववाडी, तळेरे, फोंडा, कुडाळ येथील बाजारपेठेतील दुकाने चोरट्यांनी फोडली होती. या घटनेमुळे जिल्ह्यात घबराट पसरली होती, तर पोलिस यंत्रणेसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान होते.
वैभववाडी बाजारपेठेत 15 एप्रिल रोजी पहाटे पाच दुकाने व दोन घरे, तर करुळ येथील एक दुकान व बिअर शॉपी अज्ञात चोरट्यांनी फोडली होती. यात वैभववाडी येथील अशोक कुबडे यांच्या बंद घरातील 2 लाख 24 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, तर करुळ येथील विजय पाटील यांच्या दुकानातील रोख 24 हजार रुपये असा एकूण 2 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरला होता. या चोरी प्रकरणात चोरट्यांनी सोने व रोख पैशाची चोरी केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी तळेरे बाजारपेठेत व त्यापाठोपाठ फोंडा व कुडाळ येथे बाजारपेठेत दुकाने फोडण्यात आली होती. या घटनेचा तपास वैभववाडी पोलिसांकडून सुरू होता. वैभववाडी व तळेरे येथे चोरी करताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. त्या आधारावर तपास सुरू होता. दरम्यान, गुजरात राज्यात चोरट्यांची एक गँग गुजरात पोलिसांनी रंगेहाथ पकडली होती.
जिल्ह्यातील चोरी प्रकरणात या चोरट्यांचा हात असण्याची दाट शक्यता असल्याचा संशय जिल्हा पोलिसांना आहे. यासाठी वैभववाडी पोलिस निरीक्षक अमित यादव, पोलिस उपनिरीक्षक सूरज पाटील, पोलिस राहुल तळसकर, कृष्णात पडवळ, सूरज पाटील, समीर तांबे यांचे खास पथक 2 जून रोजी गुजरातला रवाना झाले होते. बुधवारी गुजरात येथील नवसाडा येथून जेलमधून वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. रघुसिंग तेलसिंग मेहढा (वय 50), कमलसिंग रतनसिंग मेहढा (55), मोरसिंग दीपलाल बामण्या (40), बिशन मंगू मेहढा (45), परसिंग डोंगरसिंग अलावा (40), समसिंग ऊर्फ सम्राट मंगू मेहढा (40), मोहब्बत मनसिंग मेहढा (19, सर्व रा. मध्यप्रदेश) अशी या संशयीत आरोपींची नावे आहेत. हे सर्व सराईत चोरटे असून सगळी धुमाकूळ घालणार्या चड्डी-बनियन गँगचे सदस्य असल्याचे समजते. त्यांना गुरुवारी कणकवली न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. चोरट्यांचा वैभववाडी पोलिस कसून तपास करीत आहेत. जिल्ह्यातील चोरीप्रकरणात या चोरट्यांचा सहभाग असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.त्यादृष्टीने तपास सुरू आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सूरज पाटील करीत आहेत.