कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत सिंधुदुर्गला ‘अ‍ॅवॉर्ड ऑफ एक्सलन्स’! | पुढारी

कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत सिंधुदुर्गला ‘अ‍ॅवॉर्ड ऑफ एक्सलन्स’!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालय आयोजित जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धा 2020-21 साठीचा ‘अ‍ॅवॉर्ड ऑफ एक्सलन्स’ सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राप्त झाला. नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामधील नालंदा सभागृहात मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना हा अ‍ॅवार्ड गुरुवारी प्रदान करण्यात आला.

जिल्हा कौशल्य विकास आराखडा सन 2020-21 कौशल्य विकास मंत्रालय, अंतर्गत एकूण 3 वर्गवारीत देशातील एकूण 467 जिल्ह्यांच्या सहभाग होता. अ‍ॅवार्ड ऑफ एक्सलन्स पुरस्कारासाठी अंतिम फेरीत एकूण 30 जिल्हे होते. त्यापैकी एकूण 8 जिल्ह्याची निवड झाली. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे.

जिल्ह्याची सामाजिक व आर्थिक रचना समजून घेऊन, येथील तरुणांना अनुकुल अशा रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य ते कौशल्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. या अनुषंगाने या आराखड्याची निर्मिती करण्यात आली. यात कृषी, जैवीक कृषी, फळबाग संवर्धन, पर्यटन, कृषी पर्यटन, साहसी पर्यटन, समुद्र पर्यटन आदी जिल्ह्याची ओळख मानल्या जाणार्‍या कौशल्य प्रशिक्षणाची असलेली मागणी डोळ्यासमोर ठेवून नियोजन करण्यात आले. शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने अशा आराखड्यांची निर्मिती अतिशय महत्वाची आहे, असा उल्लेख पुरस्कार वितरण सोहळ्यात करण्यात आला.

Back to top button