रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज संशोधनकेंद्र उभारणार | पुढारी

रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज संशोधनकेंद्र उभारणार

सातारा : पुढारी वृत्तसेवा : 
छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती अखंड महाराष्ट्राबरोबरच देशासह जगालाही कळावी यासाठी रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भातील संशोधन केंद्र आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय तयार करण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांनी दिली.

शिवस्वराज्य दिन सोहळ्याच्या निमित्ताने सातार्‍यातील शाहू कलामंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, आ. जयंत आसगावकर, इतिहास अभ्यासक व शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल उपस्थित होते.

ना. उदय सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत कौशल्याने स्वराज्याची स्थापना केली. त्याचा जाज्वल्य इतिहास हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्याबद्दल सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे. याबाबतचे संशोधन केंद्र आणि ग्रंथालय हे स्थापन करण्यात येणार आहे. जगातील कोणालाही छत्रपती शिवाजी महाराजांबाबत माहिती हवी असल्यास त्यांना महाराष्ट्राच्या मातीत यावे लागेल. त्याबरोबरच शिवाजी महाराजांची चरित्र साधना समिती तयार करण्यात आली असून त्याच्या सदस्य सचिवपदी प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांची निवड करण्यात आल्याची घोषणाही त्यांनी केली.

महाराष्ट्र सदन उच्च व तंत्र शिक्षण विभाग ताब्यात घेणार

दिल्लीतील जुने महाराष्ट्र सदन उच्च व तंत्र शिक्षण विभाग ताब्यात घेणार असून त्याठिकाणी यूपीएससीचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांची व्यवस्था केली जाणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावेत यासाठी हे नियोजन करण्यात येणार असल्याचे ना. उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

Back to top button