रत्नागिरी : हापूस आंबा प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेत | पुढारी

रत्नागिरी : हापूस आंबा प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेत

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा आणि सानप अ‍ॅग्रो अ‍ॅनिमल्स प्रा. लि. यांच्या संयुक्त प्रयत्नांनी भारतीय आंबा प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेत रवाना झाला आहे. सुमारे 16 हजार 560 किलो आंब्याची निर्यात केली आहे. यामुळे भविष्यात आंबा निर्यातीचा खर्च कमी होणार आहे.

कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील विकीरण सुविधा केंद्र येथून अमेरिकेला देशातून प्रथमच आंब्याची समुद्रमार्गे निर्यात करण्यात आली. समुद्रमार्गे निर्यातीमुळे आंब्याचा वाहतुक खर्च 10 टक्क्यांवर येणार असून त्यामुळे अमेरिकेतील बाजारपेठेत भारतीय आंबा अन्य देशांतील आंब्याशी स्पर्धा करु शकणार आहे. समुद्रमार्गे निर्यातीमुळे आंबा सुमारे दीड महिन्यांच्या जादा कालावधीसाठी तेथील बाजारपेठेत राहील. भारतीय आंब्याच्या इतिहासातील ही अत्यंत महत्त्वाची घटना असून आंब्याच्या निर्यातीमधील क्रांतिकारक बदल यामुळे होणार आहे.

भारतातून सन 2019 मध्ये अमेरिकेस सुमारे 1200 मे. टन आंबा निर्यात झाला होता. कोरोनामुळे सन 2020 आणि 2021मध्ये अमेरिकेत निर्यात होऊ शकली नाही. अमेरिकेला होणारी आंबा निर्यात ही सध्या 100 टक्के हवाईमार्गे होत आहे. त्यामुळे निर्यातदारांना प्रतिकिलो सुमारे रु.550/- विमानभाडे अदा करावे लागत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत भारतीय आंबा किमतीच्या दृष्टीने महाग पडत असून निर्यातीवर मर्यादा येत आहेत.

सन 2019 मध्ये भाभा टोमिक रिसर्च सेंटर, अपेडा, कृषी पणन मंडळ यांनी संयुक्तरित्या आंबा समुद्रमार्गे निर्यातीचा प्रयोग केला होता. या प्रयोगामध्ये आंब्यावर गरम पाण्याची प्रक्रिया, भाभा टोमिक रिसर्च सेंटरने विकसित केलेल्या आंब्याच्या शेल्फ-लाईफसाठी थंड पाण्यातील रासायनिक प्रक्रिया, विकिरण प्रक्रिया, प्रशितकरण आणि शितगृहात साठवणूक करुन आंब्याचा कंटेनर भरुन कंटेनर कृषि पणन मंडळाच्या विकिरण सुविधेच्या आवारात विद्युत पुरवठा देऊन ठेवला होता. हा कंटेनर 38 दिवसांनी उघडण्यात आला. या कंटेनरमधील आंबा सुस्थितीत होता.

तथापि, यामध्ये काही त्रुटी आढळल्याने त्या दुरुस्त करुन पुन्हा कंटेनर ट्रायल घेणे आवश्यक होते. तथापी, सन 2020 आणि 2021 मध्ये कोरोनामुळे कामकाज होऊ शकले नाही. यंदा कंटेनर थेट अमेरिकेत पाठविण्याचे नियोजन केले. दि. 30 मे पासून आंब्यावर सर्व प्रकारच्या प्रक्रिया करुन टप्प्याटप्याने आंबा कोल्ड स्टोरेजमध्ये साठविला होता. एकूण 5,520 बॉक्सेसमधून 16,560 किलो आंबा कंटेनरद्वारे पाठविला आहे. कंटेनर दि. 5 जून रोजी अमेरिकेकडे रवाना होईल. कंटेनर अमेरिकेत नेवार्क या न्यूजर्सी शहराजवळील बंदरात पोहोचणार आहे.

दि. 29 मे 2022 ते 2 जून 2022 असे पाच दिवस आंबा नोंदणीकृत बागांमधून तोडणी करुन कृषी पणन मंडळाच्या भाजीपाला प्रक्रिया केंद्र, वाशी, नवी मुंबई येथे आणला. येथे आंब्याची प्रतवारी करुन त्यावर सोडीअम हायपोक्रोराईटची 52 अंश से. तापमानात तीन मिनिटांची प्रक्रिया करुन आंबा सुकविण्यात आला. त्यानंतर या आंब्यावर भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरने विकसित केलेल्या रसायनाची पाण्यामध्ये तीन मिनिटांची प्रक्रिया करुन पुन्हा आंबा सुकविला.

हा आंबा तीन किलोच्या बॉक्समध्ये भरुन त्याची विकिरण सुविधा केंद्रात वाहतूक करुन त्याचे अमेरिकन निरीक्षक आणि एन. पी. पी.ओ. च्या अधिकार्‍यांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या मान्यतेनंतर आंब्यावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आंबा प्रशितकरण करुन त्याची साठवणूक शीतगृहात केली होती. दि. 3 जून रोजी हा आंबा कंटेनरमध्ये भरुन कंटेनर रवाना करण्यात आला. यावेळी अमेरिकेचे क्वारंटाईन विभागाचे निरीक्षक डॉ. कॅथरीन फिडलर, एन.पी. पी. ओ. चे उपसंचालक डॉ. झेड. ए. अन्सारी, अपेडाचे उपसरव्यवस्थापक रवींद्र सानप ग्रोअ‍ॅनिमल्सचे संचालक शिवाजीराव सानप, वाफा चे अध्यक्ष अण्णा शेजवळ व अन्य अधिकारी उपस्थित होते.

समुद्रमार्गे आंबा अमेरिकेला जाणे हा भारतीय आंब्याच्या निर्यातीमधील हा एतिहासिक क्षण आहे.
– सुनील पवार,
पणन संचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक

Back to top button