बांदा : भरधाव कारच्या धडकेत पादचारी ठार | पुढारी

बांदा : भरधाव कारच्या धडकेत पादचारी ठार

बांदा ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली-कुडवटेम्ब येथे पुण्याहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्‍या आलिशान कारने दोघा पादचार्‍यांना उडवले. ही धडक एवढी मोठी होती की, यात एक पादचारी जागीच ठार झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला. महादेव वसंत झाट्ये (45) असे मयताचे नाव आहे तर विलास पांडुरंग कुडव हे या धडकेत गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर गोमेकॉ येथे उपचार सुरू आहेत. हा अपघात शुक्रवारी सकाळी 7.30 वा.च्या सुमारास झाला. याप्रकरणी बांदा पोलिसात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याच्या कडेला नेहमीप्रमाणे कामावर जाण्याकरिता महादेव झाट्ये व विलास कुडव उभे होते. दरम्यान पुण्याहून गोव्याच्या दिशेने जाणार्‍या एका कारने साईडपट्टीच्या खाली येत त्या दोघांनाही उडवले. यात महादेव झाट्ये गाडीला मधोमध धडकले व महामार्गावर आदळले.यात ते सुमारे 40 फूट फेकले गेल्याने त्यांचे डोके रस्त्यावर आदळल्याने रक्तस्त्राव होऊन ते जागीच ठार झाले. तर त्यांच्यासोबत असलेले विलास कुडव हे गाडीसोबत फरफटत गेले व रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या मुळाला ते अडकले.यात त्यांच्या पायाचे हाड मोडले तर हातावरून गाडी गेल्याने हातालासुद्धा दुखापत झाली.

भरवस्तीत महामार्गावर अपघात झाल्याने अपघाताचे वृत्त समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी महादेव झाट्ये यांना मृत घोषित करण्यात आले. अपघातानंतर बांदा पोलिस सहा. निरीक्षक श्यामराव काळे घटनास्थळी दाखल झाले. तर मृत्यूस व दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक भूषण चंद्रकांत राऊत (हवेली-पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कारमधील युवक गोवा येथे पर्यटनासाठी जात होते.

मृत महादेव झाटये हे मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या अपघाती जाण्याने इन्सुली गावावर शोककळा पसरली आहे.ते मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. परिसरात ते दाजीबा या नावाने प्रसिद्ध होते. मात्र, शुक्रवारी सकाळी ते रोजंदारीच्या कामासाठी जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

Back to top button