स्मिता संतोष कारिवडेकर हिने सर केले लडाखमधील कांगयात्से शिखर | पुढारी

स्मिता संतोष कारिवडेकर हिने सर केले लडाखमधील कांगयात्से शिखर

सावंतवाडी ; पुढारी वृत्तसेवा : गिरीप्रेमीच्या महिला संघाने लेह-लडाखमधील कांगयात्से 1 व 2 शिखराची दुहेरी मोहीम करून गिर्यारोहणाचा नवा अध्याय रचला आहे. यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावची कन्या स्मिता संतोष कारिवडेकर हिने मोहीम उपनेता म्हणून शिखर सर केले.

या महिला गिर्यारोहकांनी शिखरावर यशस्वी चढाई केली. तब्बल तीन दशकांनंतर महाराष्ट्रातील फक्‍त मुलींच्या गिर्यारोहक संघाने हिमालयात ही मोहीम आयोजित केली होती. या दुहेरी मोहिमेला शिवछत्रपती पुरस्कार विजेते गिर्यारोहक उमेश झिरपे यांचे मार्गदर्शन लाभले होते.

या मोहिमेत प्रियांका चिंचोरकर (मोहीम नेता) व स्मिता संतोष कारिवडेकर हिने (मोहीम उपनेता) व महिला संघाचे प्रशिक्षक समीरन कोल्हे यांनी कांगायात्से-1 या 6494 मीटर उंच व चढाईसाठी अत्यंत कठीण शिखरावर प्रतिकूल हवामानात यशस्वी चढाई करून तिरंगा फडकला फडकविला तर दुसर्‍या मोहिमेतील महिलांनी 6270 मीटर उंच कांगायात्से 2 शिखरावर मोहीम यशस्वी केली.

1984 नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील महिला संघाला हे यश मिळाले आहे. स्मिता कारिवडेकर ही सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावची कन्या आहे. येथील आर.पी. डी हायस्कूलमध्ये आठवीत शिकत असताना तिने शालेय संघातून हॉकी खेळताना पंजाब येथे झालेल्या स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते. यानंतर शासनाच्या माध्यमातून पुणे- बालेवाडी येथे तिची पुढील शिक्षणासाठी व्यवस्था करण्यात आली होती.

पुणे येथे तिने एम.बी.ए. पर्यंत शिक्षण घेतले असून सध्या ती हॉकी खेळाडू म्हणून टाटा कंपनीमध्ये नोकरी करत आहे. कारिवडे येथील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ पदाधिकारी सुबोध कारिवडेकर यांची ती मानसकन्या आहे.

सुबोध कारिवडेकर म्हणाले, हॉकी खेळामध्ये तिने यश संपादन केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी शासनाने तिला पुणे-बालेवाडी येथे क्रीडा संकुलात संधी उपलब्ध करून दिली. तेथे तिने दर्जेदार शिक्षण घेत खेळाडू म्हणूनही प्रगती केली. हिमालयातील शिखर गिरीप्रेमींच्या माध्यमातून तिने गाठले याचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहेे.

Back to top button