वेंगुर्ले- मठ येथे रिक्षा व दुचाकीची धडक : चार जखमी

वेंगुर्ले- मठ येथे रिक्षा व दुचाकीची धडक : चार जखमी

वेंगुर्ले : वेंगुर्ले मठमार्गे सावंतवाडी – कुडाळ मुख्य मार्गावर मठ येथील पेट्रोलपंपासमोर बुधवारी रात्री 11.30 वा. रिक्षा व दुचाकी यांच्यात धडक बसून अपघात झाला. यामध्ये चारजण जखमी झाले असून त्यांच्यावर वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर 3 जणांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले. एकाला उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. रिक्षा मठ येथून वेंगुर्ले येथे तर मोटारसायकल वेंगुर्लेवरुन पिंगुळी येथे जात असताना हा अपघात घडला.

वेंगुर्ले येथील राजन परब हे रिक्षा भाडे घेऊन वेंगुर्ले रामघाट रोड येथे येत होते.यावेळी पिंगुळी गोंदयाळवाडी येथील मोटरसायकलस्वार सलमान शौकत शेख याने भराधाव वेगात येत मोटरसायकल रिक्षाला ठोकरली.यात सलमान शेख याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जखमी झाला. तसेच रिक्षाचालक राजन परब यांच्या डोक्याला, कानाला व उजव्या हातास मार लागला. तसेच रिक्षातील रुपाली राजन परब व स्नेहलता गावडे या गंभीर जखमी झाल्या. तर दुचाकीवरील मागे बसलेल्या व्यक्तीस सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही.

वेंगुर्ले पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिस नाईक बंड्या धुरी,पोलिस नाईक दादा परब यांनी घटनास्थळी धाव घेतली.स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असलेल्या तिघांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले. अपघाताची खबर रुपाली परब यांनी पोलिसात दिली.अधिक तपास पोलिस हवालदार डी. बी.पालकर हे करीत आहेत.

तिलारी घाटात ट्रकला अपघात

तिलारी घाटात कोल्हापूर ते गोवा अशी अवजड सामानाची वाहतूक करणारा ट्रक जयकर पॉईंट येथील मोठ्या उतारावरील वळणावर आला चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्ता सोडून कठड्याला धडकला व अपघात झाला. सुदैवाने कठडा असल्याने हा ट्रक मोठ्या दरीत कोसळण्यापासून वाचला.

गुरुवारी सकाळी हरियाणाहून कोल्हापूर-तिलारी घाटमार्गे गोवा अशी अवजड मालाची वाहतूक करणारा ट्रक तिलारी घाटातून खाली उतरत असताना ट्रक चालकाला घाट रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्ता सोडून रस्त्याकडेच्या कठड्याला धडकला.कठड्याला धडकल्याने ट्रक खोल दरीत कोसळण्यापासून वाचला आणि सुदैवाने मोठा प्रसंग टळला.अपघातात ट्रकच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

चिंदर येथे खासगी बसच्या धडकेत तिघेजण जखमी

कणकवली-आचरा मार्गावर बुधवारी रात्री 9.30 वा.च्या सुमारास चिंदर बाजार परिसरात आचर्‍याच्या दिशेने येणार्‍या एका खासगी बसच्या डिकीचा उघडा राहिलेल्या दरवाजाची धडक बसून तिघेजण जखमी झाले. तर रस्त्याच्या कडेला असलेल्या रिक्षाला धडक बसल्याने रिक्षाचेही नुकसान झाले. या धडकेत महावीर आरोलकर (61, रा.कुडाळ), दर्शना भोळे (62, रा. रत्नागिरी) या किरकोळ तर रोहित तर्फे (24, रा. त्रिंबक) हा गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी कणकवली येथे हलवण्यात आले आहे. बस चालकांवर आचरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अपघाताची माहिती मिळताच आचरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्यासह अक्षय धेंडे, अनिकेत सावंत, एम. एम. देसाई, ए.आर.बाभल, सुशांत पुरळकर घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी खाजगी बस ताब्यात घेत हयगयीने बस चालवणार्‍या बस चालक आनंद रवींद्र सकपाळ (रा. भांडुप) याच्यावर अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कासार्डेत ट्रक व कारची धडक

मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे-जांभूळवाडी बसस्टॉप समोर कार व मालवाहू ट्रक याच्यात अपघात झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी 9.30 वा.च्या सुमारास घडला. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.कणकवलीवरुन खारेपाटणच्या दिशेने जाणार्‍या लेनवर मालवाहू ट्रक व कार या एकाच दिशेने जात असताना कासार्डे-जांभूळवाडी बसस्टॉप येथे एसटीबस थांबली असता मागाहून येणारा मालवाहू ट्रक व कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने दोन्ही वाहने एकमेकांना धडकल्याने अपघात घडला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news