ओसरगावात 1 जूनपासून टोल वसुलीच्या हालचाली! | पुढारी

ओसरगावात 1 जूनपासून टोल वसुलीच्या हालचाली!

कणकवली : पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्गात महामार्ग चौपदरीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. मात्र, ओसरगाव येथील टोल नाक्यावर 1 जूनपासून टोल वसुली सुरू करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळपासून टोल वसुलीचे कंत्राट मिळालेल्या हैदराबाद येथील एमडी करीमुनिसा या कंपनीच्या अधिकारी, कर्मचार्‍यांकडून ट्रायल बेसवर चाचणी घेण्यात आली. मात्र, यावेळी नियोजनाअभावी बूथ लेनजवळ लावण्यात आलेले स्वयंचलित बॅरिअर अनेक वाहनांवर पडल्याने वाहनचालकांची टोल वसुली कंपनीच्या कर्मचार्‍यांबरोबर जोरदार वादावादी झाली. जनतेला कुठलीही कल्पना न देता आणि महामार्गाचे काम अपूर्ण असताना टोल वसुलीची घाई का केली जात आहे? याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्प का, असे सवाल उपस्थित होत आहेत.

सिंधुदुर्गात महामार्ग चौपदरीकरणाचे काम आजही अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. अनेक प्रकल्पग्रस्तांना अद्यापही जमीन मोबदला मिळालेला नाही, सर्व्हिस रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत, वागदे-गडनदी पुलाजवळ महामार्गाची एक लेन अर्धवट स्थितीत आहे. या प्रलंबित कामांबाबत ठिकठिकाणी ग्रामस्थांची आंदोलने, उपोषणे सुरू आहेत. असे असतानाही जनतेला गृहीत धरत ओसरगाव येथील टोलनाक्यावर टोलवसुली कंत्राटदार कंपनीने चाचणीस सुरुवात केली. ‘ओसरगाव फी प्लाझा’ या नावाने हे टेंडर काढून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने याबाबतची आवश्यक ती प्रक्रिया एप्रिल महिन्यात पूर्ण केली आणि टेंडर मिळालेल्या एमडी करिमुनिसा या हैदराबाद येथील कंपनीबरोबर 25 मे ला करार करत वर्कऑर्डर दिली. मात्र, याबाबत दिलेल्या पत्रावर टोलनाका टोलवसुली करण्यासाठी हस्तांतरण केल्याची तारीख नमूद करण्यात आलेली नाही. दरदिवशी या टोलनाक्यावर 6 लाख 53 हजार 894 रू. एवढे कलेक्शन केले जाणार आहे.

गुरुवारी सकाळी ओसरगाव येथील टोलनाक्यावर कंपनीच्या कर्मचार्‍यांनी चाचणी घेण्यास सुरुवात केली, त्यावेळी स्वयंचलित बॅरियर काही वाहनांवर पडल्याने वाहनचालक संतप्त झाले आणि त्यांनी अधिकारी, कर्मचार्‍यांना जाब विचारला. यावेळी कंपनीचे कर्मचारी लवकरच टोलवसुली केली जाणार असल्याची पत्रके वाहनचालकांना वाटत होते. मुळात महामार्गाचे कामच अपूर्ण आहे, असे असताना टोलवसुलीसाठी मात्र तत्परता दाखवण्यात आली आहे. टोलनाक्यावर सार्वजनिक शौचालय, स्वच्छतागृह, वजनकाटे आदी सुविधांची आवश्यकता असते. मात्र, या कोणत्याही सुविधा याठिकाणी केलेल्या नाहीत. त्यामुळे पुढील काही दिवसात या टोलवसुलीविरूध्द संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. गुरुवारी दुपारपासून काही वाहनांकडून या ठेकेदार कंपनीने टोल वसुली केल्याचेही समोर आले आहे. या टोलवसुलीकरिता स्थानिक 25 कर्मचारीवर्ग भरती करण्यात आला आहे. या टोलनाक्यावर कंपनीचे एकूण 35 कर्मचारी कार्यरत असणार असल्याचे टोलवसुली ठेकेदार कंपनीच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. टोलवसुली करत असताना या टोलमधून दुचाकी, तीन चाकी, ट्रॅक्टर, ट्रॉली, रुग्णवाहिका या वाहनांना वगळण्यात आले आहे. एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची पूर्णपणे टोलमाफीची मागणी असताना दुसरीकडे अशाप्रकारे सवलतीचे गाजर दाखवत स्थानिक जनतेचा रोष कमी करण्याचा प्रयत्न ठेकेदार कंपनीकडून करण्यात आला आहे.

चाचणीच्या पहिल्याच दिवशी वाहनचालकांनी लोकांना कल्पना दिल्याशिवाय टोलनाका सुरू का केला? जनजागृती का केली नाही? टोलवसुलीबाबतचे रितसर पत्र दाखवा, असे विविध प्रश्न विचारत टोल वसुली कंपनीच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना धारेवर धरले. दुपारी मनसे नेते परशुराम उपरकर यांनी तर सायंकाळी शिवसेना नेते सतीश सावंत, कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष संदेश पारकर यांनीही टोलवसुली कंपनीच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना जाब विचारत हायवेची सर्व कामे मार्गी लागत नाहीत तोपर्यंत टोलवसुली सुरू करू देणार नाही, असा इशारा दिला.

या टोल नाक्यावर सद्यस्थितीत महामार्ग चौपदरीकरण कामाच्या ठेकेदार कंपनीने टोल नाका उभारताना दुचाकी व टोलमुक्त असलेल्या वाहनांकरिता स्वतंत्र लेन ठेवण्याची गरज होती. मात्र, तशी लेन ठेवलेली नसल्याने मुंबईकडे जाणार्‍या व मुंबईहून येणार्‍या दोन्ही मार्गांवर शेवटच्या लेन या टोलमुक्त असणार्‍या वाहनांसाठी ठेवण्यात येणार असल्याचे टोल वसुली ठेकेदार कंपनीकडून सांगण्यात आले. टोलवसुलीबाबत वर्कऑर्डर मिळाल्यानंतर टोलमुक्त वगळून अन्य प्रत्येक वाहनांकरिता फास्टटॅगमधून कट होणार्‍या टोलची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. ओसरगाव टोलनाक्यावरून जाणार्‍या कार, जीप, व्हॅन आदी लाईट मोटर व्हेईकलच्या सिंगल एन्ट्रीसाठी 90 रुपये तर एका दिवसांत जाण्या-येण्यासाठी 135 रुपये दर ठेवण्यात आला आहे.

याचधर्तीवर मिनीबससाठी सिंगल एन्ट्री 145 रुपये आणि जाण्या-येण्यासाठी 220 रुपये, ट्रक आणि बससाठी 305 आणि 460 रुपये, कमर्शिअल थ्री एक्सेलसाठी 335 आणि 500 रुपये, चार ते सहा एक्सेल वाहनांसाठी 480 आणि 720 रुपये तर सात एक्सेल किंवा त्या पुढील अवजड वाहनांसाठी 585 आणि 875 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. याखेरीज या सर्व वाहनांसाठी मासिक पासचेही दर निश्चित करण्यात आले आहेत. तर सिंधुदुर्ग आरटीओ नोंदणीकृत कमर्शिअल वाहनांसाठी एका फेरीसाठी 50 टक्के सुट देण्यात आली आहे. यात कार, जीप, व्हॅन आदींसाठी 45 रुपये, मिनीबससाठी 75 रुपये, ट्रक आणि बससाठी 115 रुपये तर तीनचाकी वाहनांसाठी 165रुपये, चार ते सहाचाकी वाहनांसाठी 240रुपये आणि त्यापुढील अवजड वाहनांसाठी 290 रुपये असा सिंगल एन्ट्रीसाठी पास असणार आहे. याखेरीज स्थानिकांसाठी 315 रुपयांचा मासिक पास दर निश्चित करण्यात आला आहे.

दरम्यान, या टोलनाक्यावरून जाणार्‍या अनेक सिंधुदुर्गातील वाहनचालकांनी सिंधुदुर्गातील महामार्गाच्या चौपदरीकरणाची अनेक कामे अपूर्ण असून ही कामे पहिली पूर्ण करा व त्यानंतरच टोलवसुली सुरू करा, अशी मागणी या दरम्यान केली. मात्र, कंत्राटदार कंपनीने टोलवसुलीची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय नेतेमंडळी आणि लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

20 कि.मी.परिघातील वाहनांना मासिक पास

ओसरगाव टोलनाक्याच्या 20 कि.मी. परिघातील लोकल वाहनांना महिन्याचा पास देण्यात येणार आहे. मात्र, या वाहनांना फास्टटॅग अनिवार्य असून, महिन्याच्या पासकरिता 315 रुपये या वाहन चालकांना मोजावे लागणार आहेत. तसेच या 20 कि.मी. परिघातील खासगी व्यवसायिक वाहनांकरिता देखील टोल नाक्यावर 50 टक्के सवलत देण्यात येणार असून, ही सवलत देखील फास्टटॅग या माध्यमातूनच मिळणार आहे. जेणेकरून या 20 कि.मी. परिघातील वाहनचालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, या 20 कि.मी. परिघातील वाहनांना ही सवलत लागू होत असताना त्यांच्या वाहनाच्या आरसी बुकवर त्यांच्या ठिकाणांचा पत्ता असण्याची गरज आहे, अशाच वाहनांना ही सवलत लागू होणार आहे.

Back to top button