रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील किरबेट इथं दोन गव्यांचा मृत्यू | पुढारी

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील किरबेट इथं दोन गव्यांचा मृत्यू

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथील उदगिरीच्या डोंगराजवळ शांताराम जयगडे यांच्या मालकीच्या जागेत दोन गवारेड्यांचा शिंगात शिंग अडकल्याने व नंतर शिंगे सुटू न शकल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

देवरूख वनविभागाच्या माहितीनुसार किरबेट येथील मनोज जायगडे हे आपली गुरे चारण्यासाठी मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रानात जात असताना त्यांना उदगिरीच्या डोंगराजवळ दोन गवारेडे मृतावस्थेत असल्याचे आढळले. ही बाब त्यांनी लागलीच पोलिस पाटील प्रदीप अडबल व देवरूख वन विभागाला कळवली. माहिती मिळताच पोलिस पाटील प्रदीप अडबल, सरपंच रेवती निंबाळकर यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व वन विभागाला याची कल्पना दिली.

घटनेची माहिती देण्यात आल्यावर परिक्षेत्र वनाधिकारी प्रियांका लगड, देवरूखचे वनपाल तौफिक मुल्ला, वनरक्षक नानु गावडे, मिलिंद डाफळे, सुरेश तेली, राजाराम पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण कुणकवळेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या वेळी सरपंच रेवती निंबाळकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

पंचनामा झाल्यानंतर अथक प्रयत्नानंतर शिंगात शिंग अडकलेल्या स्थितीत असलेल्या दोन्ही मृत गवारेड्यांना बाजूला करण्यात आले. या नंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत या दोन्ही मृत गवरेड्यांवर वन विभागाकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. या गवरेड्यांची झुंज लागली असावी व झुंजाताना बराच वेळ शिंगात शिंगे अडकल्याने ही शिंगे शेवटपर्यंत सुटू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनपाल तौफिक मुल्ला यांनी व्यक्त केला आहे.

या मृत गवहरेड्यांचे वय सरासरी सात व आठ वर्षाचे असल्याचे मुल्ला यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, दोन गवारेड्यांचा शिंगात शिंग अडकून त्यांचा मृत्यू झाल्याची संगमेश्वर तालुक्यातील ही पहिलीच घटना असून या मृत गवरेड्यांना पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

Back to top button