रत्नागिरी : ‘हापूस’ हंगाम अंतिम टप्प्यात! | पुढारी

रत्नागिरी : ‘हापूस’ हंगाम अंतिम टप्प्यात!

देवगड; सूरज कोयंडे : आंबा हंगाम अंतिम टप्प्यात असून राहिलेला आंबा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शेवटच्या टप्प्यात आंब्याचे वाढलेले प्रमाण, उष्मा व फळमाशीमुळे आंब्याचे झालेले नुकसान, दरात झालेली घसरण अशा स्थितीमुळे बागायतदारांचा कल कॅनिंगकडे असल्याने शेवटच्या टप्प्यात आंबा उत्पादन चांगले येऊनही बागायतदारांना कवडीमोलाने विकावा लागला. मात्र, कॅनिंगचे दर शेवटपर्यंत टिकून राहिले, हीच बागायतदारांसाठी जमेची बाजू राहिल्याचे आंबा बागायतदार विद्याधर जोशी यांनी सांगितले.

एकीकडे अवकाळी पावसामुळे देवगड हापूसवर फळमाशीचा प्रादुर्भाव वाढल्याने हापूस आंब्याची झालेली वाताहात तर दुसरीकडे आंब्याचे गडगडलेले दर यामुळे मुबलक आंबा असूनही बागायतदारांचे नुकसान झाले. फळमाशीमुळे आंबा धोक्यात आला. त्याचबरोबर वाढत्या उष्म्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा गळून पडला. सुरुवातीला दर चांगला होता. मात्र, त्यानंतर मार्केटमध्ये आंब्याचे दर गडगडल्याने बागायतदारांना आंबा विक्रीसाठी पर्याय शोधावे लागले. त्यात फळमाशीचा अ‍ॅटॅक झाल्याने आंबा विक्रीवरही त्याचा मोठा परिणाम झाला.

फळमाशीचा अ‍ॅटॅकने आंब्यावर डाग, ठिपके पडत असल्याने हा आंबा बाजूला करून चांगला आंबा बागायतदारांना विक्रीसाठी काढावा लागला. फळमाशीने डंख मारल्याने 50 टक्के आंबा वाया गेला. शेवटच्या टप्प्यात आंबा वाढला. मात्र, पावसाची चिन्हे, फळमाशीचा प्रादुर्भाव, उष्म्यामुळे आंब्याची होत असलेली घळ यामुळे शिल्लक आंबा काढण्यासाठी बागायतदारांची सध्या लगबग सुरू असून हा आंबा बॉक्समध्ये पॅकिंग करून विक्रीसाठी पाठविण्याऐवजी काढलेला आंबा तत्काळ कॅनिंगला देण्याकडे बागायतदारांचा सध्या जास्त कल आहे. त्यातकरून कॅनिंगचे दरही अद्यापर्यंत टिकून असल्यामुळे यावर्षी कॅनिंगवर बागायतदारांचा जास्त भर असल्याचे बागायतदार विद्याधर जोशी यांनी सांगितले.

आंबा हंगाम मे अखेरपर्यंत संपेल. मात्र, आंबा चांगला होवूनही वातावरणातील बदल, फळमाशीला पोषक वातावरण यामुळे तिचा पिकावरील अ‍ॅटॅक हा बागायतदारांच्या नुकसानीस कारणीभूत ठरला. दरवर्षी अंतिम टप्प्यात फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. मात्र, यावर्षी सुरुवातीपासून पोषक वातावरणामुळे फळमाशीने आंबा पिकाचे नुकसान केल्याने बागायतदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, असे मत आंबा बागायतदार जनार्दन तेली यांनी व्यक्त केले. यावर्षीचा आंबा हंगाम शेतकरी, बागायतदारांसाठी तणावाखाली गेला, अशी खंत आंबा बागायतदार सुधीर जोशी यांनी व्यक्त केली.

Back to top button