रत्नागिरी : बदल्यांच्या आदेशाकडे गुरुजींचे लक्ष

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
कोव्हिड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून रखडलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात पहिल्या टप्प्यात जिल्हा बदली पात्र शिक्षकांची नावे, मोबाईल नंबर, मेल आयडी, आधार क्रमांक यासह अन्य आवश्यक माहिती अपडेट करण्यात आली असून, ही अद्ययावत माहिती ग्रामविकास विभागाला सादर करण्यात आली आहे. प्रक्रिया सुरू झाली असली तरी बदल्या कधी होणार? याबाबत अजूनही शासनाकडून कोणतेही आदेश नाहीत.
शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांसाठी तयार केलेल्या सॉफ्टवेअरची तांत्रिक चाचणी अंतिम टप्प्यात असून, लवकरच ते कार्यान्वित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविण्यासाठी मार्च महिन्यांत ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीला ग्रामविकास विभागाचे सचिव, उपसचिव, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक उपस्थित होते.
यात 12 विषयांवर चर्चा झाली होती. सर्वसाधारपणे कार्यक्षेत्रात दहा वर्षे आणि एकाच शाळेवर पाच वर्षे पूर्ण करणारे, अवघड क्षेत्रात तीन वर्षे सेवा करणार्या शिक्षकांना बदलीसाठी हक्क आहे. यासह संवर्ग एकमधील दुर्धर आजाराने पीडित शिक्षक, मतीमंद मुलांचे माता पिता, पती आणि पत्नी एकत्रिकरण या प्रकारात मोडणारे शिक्षक बदलीसाठी पात्र आहेत.
शिक्षकांच्या बदल्यासाठी यूडायसनुसार शाळा आणि शिक्षकांची माहिती अद्ययावत करणे, शिक्षकांचे रोस्टर अद्ययावत करून त्यास विभागीय आयुक्तांची मंजुरी घेणे, अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करणे, शिक्षकांचे आधार अपडेट करणे, शिक्षकांचे समानीकरण करणे, न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांच्या नेमणुका करणे आदी विषयाचा समावेश होता. या सूचनानूसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण
विभागाने सर्व माहिती अद्ययावत करून बदली पात्र शिक्षकांची माहिती, रिक्त जागांचा तपशील, शिक्षकांची जन्म तारीख, आधार नंबर, पॅन नंबर, शालार्थ आयडीत तसेच शाळा बेस आणि शिक्षक बेस माहिती तयार करून ती ग्रामविकास विभागाला सादर केली आहे. दरवर्षी साधारणपणे 31 मेच्या आत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. मात्र, दोन वर्षापासून कोव्हिडच्या संसर्गामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नव्हत्या. यंदा मात्र शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. शिक्षण विभागाने मागील 15 दिवसांपूर्वीच शिक्षकांच्या सेवाविषयक माहिती ग्रामविकास सादर केलेली आहे. या बदल्यांकडे आता शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यात एकाचवेळी होणार ऑनलाईन प्रक्रिया
ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदलीसाठी सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सीईओच्या अध्यक्षतेखाली एक समिती केली असून मागील आठवड्यात या समितीने नव्याने तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या काही तांत्रिक चाचण्या होणे बाकी असल्याचे ग्रामविकास विभागाला कळविले आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसांत तांत्रिक चाचण्यापूर्ण झाल्यावर ते शिक्षकांना बदलीसाठी खुले करण्यात येणार आहे. यात बदली हक्क प्राप्त शिक्षकांना त्यांची माहिती भरता येणार असून, त्यानंतर एकाच वेळी राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची ऑनलाईन प्रक्रिया राबवता येणार आहे.