शिवसेना नेते रामदास कदम करणार कमबॅक?; 'मातोश्री'वरून आले निमंत्रण | पुढारी

शिवसेना नेते रामदास कदम करणार कमबॅक?; 'मातोश्री'वरून आले निमंत्रण

खेड; अनुज जोशी : गेल्या अनेक दिवसांपासून मातोश्री पासून दूर असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय उलथापालथीच्या परिस्थितीत शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते रामदास कदम यांच्यावर पक्ष पुन्हा जबाबदारी सोपवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा विधानपरिषदेत कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ते सक्रिय राजकारणातून गेल्या काही महिन्यांपासून दूर होते. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या सोबत त्यांच्या झालेल्या संघर्षामुळे कदम हे मातोश्री पासून दुरावले असल्याची चर्चा होती. ते अन्य पक्षाच्या वाटेवर असल्याच्या वावड्यादेखील त्यांच्या राजकीय शत्रूंनी उठवल्या. मात्र आपण भगव्याशी एकनिष्ठ असून बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक असल्याचे कदम यांनी ठामपणे सांगितले.

गुरुवारी दि १२ रोजी कदम यांनी लिहिलेल्या जागर कदम वंशाचा या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खा. गजानन कीर्तिकर, एकनाथ शिंदे व उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी शिवसेनेतील एक शक्तिशाली नेते असलेले शिंदे यांनी रामदास कदम तुम्हाला प्रवाहात राहायचंय, सेकंड इनिंगची सुरुवात जोरदार करा, असे सांगत बाळासाहेबांच्या काळातील तुम्ही फायरब्रँड नेते आहात. तुमची आम्हाला आणि समाजाला गरज आहे. अनेक कठीण प्रसंगात पक्षासाठी झोकून तुम्ही काम केले आहे. भाई तुम्ही डोक्यात काही ठेऊ नका. सेकंड इनिंग जोरदार सुरु करा, असे जाहीर आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.

राज्यात मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन रान उठवत आहेत. त्याच वेळी शिवसैनिकामध्ये ज्वलंत हिंदुत्वाचा निखार फुलवणारे वक्तृत्व लाभलेले शिवसेना नेते अशी ओळख असलेले रामदास कदम राजकारणापासून दूर आहेत. शिवसेनेची मुलुख मैदान तोफ बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेल्या कदम यांनी या परिस्थितीत राजकारणात पुनरागमन करावे अशी अनेक शिवसैनिक व नेत्यांचीदेखील इच्छा असल्याची चर्चा आहे.

त्यातच एकनाथ शिंदे यांनीही रामदास कदम यांना शिवसेनेत पुन्हा सक्रिय होण्याचे आवाहन केले. रामदास कदम यांचे शिवसेनेत पुनर्वसन होण्याचे संकेत मिळत असले व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईत १४ तारखेला होणाऱ्या सभेसाठी रामदास कदम यांना आमंत्रित करण्यात आले असले तरी रामदास कदम यांनी मात्र आपण गावातील धार्मिक कार्यक्रमाचे कारण देत या सभेला उपस्थित राहू शकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

परंतु कार्यक्रम उरकल्यावर आपण मातोश्रीवर जाऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ असे त्‍यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे रामदास कदम यांना शिवसेनेमार्फत कोणती जबाबदारी दिली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Back to top button