रत्नागिरीच्या बांधकाम विभागात महिला इंजिनिअरचे वर्चस्व! | पुढारी

रत्नागिरीच्या बांधकाम विभागात महिला इंजिनिअरचे वर्चस्व!

सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्र म्हणजे पुरुषांची मक्तेदारी… असे म्हटले जाते. मात्र, फार पूर्वीपासून काही महिला या क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवत आहेत. या महिलांचे कार्य जनतेसमोर आलेले नाही. एखाद्या बांधकाम साईटवर जाऊन एक महिला इंजिनिअर नियोजन करते, इमारत उभी करण्यात मेहनत घेते या बाबी कानावर कमी ऐकायला मिळतात. रत्नागिरी विभागीय बांधकाम कार्यालयात महिला अधिकारी आणि महिला कर्मचारी यांचीच मक्तेदारी चालते. कार्यकारी अधीक्षक अभियंता छाया नाईक व त्यांचीच छोटी बहीण कार्यकारी अभियंता वीणा पुजारी व त्यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 17 महिला सिव्हिल इंजिनिअर म्हणून सेवा बजावत आहेत. या दोन्ही बहिणींनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर अनेक शासकीय प्रकल्प उत्तमरित्या पूर्ण केले आहेत.

मूळचे बेळगाव येथील हे पुजारी कुटुंब आहे. सहा भावंडे असलेल्या या कुटुंबात शिक्षणाला अधिक अग्रक्रम होता. सहा मुलांनी शिकून मोठे व्हावे आणि नोकरी करावी, अशी आई-वडिलांची इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. त्यात आम्हाला यशदेखील मिळाल्याचे कार्यकारी अधीक्षक अभियंता छाया नाईक यांनी सांगितले. आम्ही 3 बहिणी आणि 2 भाऊ इंजिनिअरिंगकडे वळलो. तर एक भाऊ शेती करतो, एक छोटी बहीण कोल्हापूर सीपीआर हॉस्पिटलमध्ये बायोमेडिकल इंजिनिअर आहे. आम्ही दोघीही स्पर्धा परीक्षा देऊन बांधकाम विभागात आलो असेही त्यांनी सांगितले.

छाया नाईक यांची 2000 साली एमपीएससीमार्फत सहायक कार्यकारी अभियंता म्हणून निवड झाली. औरंगाबाद, अलिबाग, मुख्य अभियंता कार्यालय मुंबई, सिंधुदुर्ग जि.प., कणकवली, पुणे पोलिस हाऊसिंग, पुणे दक्षता पथक येथे उत्तम सेवा बजावल्यावर 2020 साली त्यांची बदली रत्नागिरी येथे अधीक्षक अभियंता म्हणून झाली. मुळात सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची वृत्ती असल्याने या वीस वर्षांत त्यांना जास्त विरोधाला सामोरे जावे लागले नाही. आपले काम चोखपणे पार पाडले तर अडचणी आल्या तरी त्रास होत नाही. प्रामाणिकपणाचे तत्त्व कायमचे पाळणे गरजेचे आहे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते, असेही छाया नाईक यांनी सांगितले. माझ्या करिअरमध्ये आई-वडील, पती आणि भावंडं यांनी दिलेली साथ दिशादर्शक ठरल्याचेही त्यांनी सांगितले. छाया नाईक यांना 2 मुले असून ती शिक्षण घेत आहेत. त्यांना वाचनाची आणि गाणी ऐकण्याची आवड आहे.

छाया नाईक व त्यांची छोटी बहीण वीणा पुजारी यांनी कोरोना काळात केलेली कामगिरी महत्त्वपूर्ण आहे. महिला रुग्णालय, न्यायालयाची नवीन इमारत याचे हस्तांतरण करण्यात आले. याशिवाय जिल्ह्यातील अनेक अपूर्ण बांधकामे, काही प्रकल्पही या दोघींच्या मार्गदर्शनाखाली टीमने पूर्ण केले आहे. आमचे वडील मारुती पुजारी हे बांधकाम विभागात एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर होते. त्यामुळे आमचे संपूर्ण कुटुंबच इंजिनिअरिंग क्षेत्रात असल्याचे समाधान आहे, असे वीणा पुजारी सांगतात.

माझ्या मोठ्या बहिणीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 18 जणी काम करतो. तर 10 महिला फिल्डवर काम करतात. जिप घेऊन फिरून साईटवर लक्ष ठेवून असतात. आताच्या मुली सिव्हील इंजिनिअर म्हणून खूप मेहनतीने काम करतात. दिलेली जबाबदारी वेळेत आणि प्रामाणिकपणे पार पाडतात. कोणत्याही साईटवर कोणतीही कारणे पुढे न करता काम करतात. एक महिला इंजिनिअर म्हणून त्या अगदी धाडसाने वावरत असतात. कोणताही बडेजाव या मुलींमध्ये नसतो. रत्नागिरीची टीम खूप चांगली असल्याचे वीणा पुजारी यांनी सांगितले.
वीणा पुजारी या 2003 पासून रत्नागिरीत कार्यरत आहेत. यांनीदेखील रत्नागिरीत कार्यकारी अभियंता म्हणून उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडली आहे. मुलींनी या क्षेत्रात यावे, या ठिकाणी करियर करायला खूप वाव असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. डॉक्टर, कॉम्प्युटर इंजिनिअरकडे मुलींचा कल अधिक असतो. मात्र, सिव्हिल इंजिनिअरिंग हेदेखील करिअरचे वेगळे आणि चांगले क्षेत्र आहे, असेही त्यांनी सांगितले.

रत्नागिरी बांधकाम विभागात पूजा जाधव-विद्युत अभियंता, पूजा इंगवले- उपअभियंता, कनिष्ठ अभियंता: ज्योती बंडगर, सायली देवरे, स्वामिनी साळवी, नंदिनी भुजबळ, अक्षता उमप, प्रिया जाधव आदी उत्तम टीमवर्क करत आहेत.

Back to top button