Nitesh Rane : नितेश राणे यांची पाच तास कसून चौकशी | पुढारी

Nitesh Rane : नितेश राणे यांची पाच तास कसून चौकशी

कणकवली ; पुढारी वृत्तसेवा : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्‍लाप्रकरणी पोलिस कोठडीत असलेले भाजपचे आ. नितेश राणे यांची गुरुवारी सकाळी 10.30 पासून दुपारी 3.30 पर्यंत कणकवली पोलिस ठाण्यात या गुन्ह्याचे चौकशी अधिकारी तथा कणकवलीचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी त्यांच्या दालनात तब्बल पाच तास कसून चौकशी केली. (Nitesh Rane)

पोलिस तपासात पुढे आलेल्या बाबींच्या अनुषंगाने ही चौकशी झाली. त्यानंतर सायंकाळी त्यांना गोव्यात तपासासाठी नेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे यामागे गोवा कनेक्शन आहे का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तर पोलिस कोठडीत असलेले आ. नितेश राणे यांचे स्वीयसहाय्यक राकेश परब यांचीही पोलिस ठाण्यात गुरुवारी स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली.

पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने कणकवली न्यायालयासमोर हजर

शुक्रवारी पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने या दोघांनाही कणकवली न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. बुधवारी आ. नितेश राणे हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुपारी कणकवली न्यायालयासमोर शरण गेले होते. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्‍तिवाद ऐकून घेवून त्यांना दोन दिवसांची म्हणजे 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली होती.

त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत कणकवली पोलिस ठाण्यात सायंकाळी नेले होते. तेथून काही वेळाने त्यांना रात्री सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या कोठडीत नेण्यात आले. तर गुरुवारी सकाळी त्यांना चौकशीसाठी कणकवली पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

साधारणपणे सकाळी 10.30 वा.पासून दुपारी 3.30 वा.पर्यंत कणकवली पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात आली. यावेळी पोलिस ठाण्याच्या आवारात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस तपासात यापूर्वी पुढे आलेले मुद्दे आणि पुराव्यांच्या अनुषंगाने चौकशी पोलिसांनी केल्याचे समजते.

आ.नितेश राणे यांची यापूर्वीही पाचवेळा कणकवली पोलिस ठाण्यात चौकशी झाली आहे. मात्र, ते पोलिस कोठडीत आल्यानंतर आणखी काही चौकशी पोलिसांनी त्यांच्याकडे केल्याचे समजते.

सायंकाळी 3.30 वा. आ. नितेश राणे यांना कणकवली पोलिस स्थानकातून ओरोसच्या दिशेने नेण्यात आले. मात्र, त्यांना गोव्यात चौकशीसाठी नेण्यात आल्याची चर्चा होती. त्याचबरोबर या हल्ल्याचा कट पुण्यात रचला गेल्याने त्यांना पुण्यातही नेले जाणार असल्याची चर्चा होती.

मात्र, याबाबतचा अधिक तपशील समजू शकला नाही. आ. राणे व राकेश परब यांच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपत असून त्यांना कणकवली न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी तीन संशयित आरोपी अटक व्हायचे आहेत. त्यात दोघेजण पुण्यातील आहेत. त्या अनुषंगानेही पोलिसांना तपास करावयाचा आहे. त्यामुळे पोलिस पुन्हा आ.नितेश राणे यांच्या कोठडीची मागणी करतात का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Nitesh Rane : राणेंना सावंतवाडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा आणले

संतोष परब हल्लाप्रकरणी न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावल्यानंतर आ. नितेश राणे यांना बुधवारी रात्री उशिरा कडक पोलिस बंदोबस्तात सावंतवाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी राणे यांना सर्वसामान्य आरोपींप्रमाणे सावंतवाडी पोलिस कोठडीत रात्र काढावी लागली.

पहाटे चहा व नाश्ता झाल्यावर कणकवली पोलिस सकाळी 8 वाजता त्यांना तपासासाठी पुन्हा कणकवली पोलिस ठाण्यात घेवून आले. यावेळी पोलिस ठाण्याच्या आवारात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर आतमध्ये कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही.

बुधवारी रात्री उशिरापर्यंत आ. राणे (Nitesh Rane) यांना कुठे ठेवावे याबाबत जिल्हा पोलिस प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळली होती. तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून नितेश राणे यांना कणकवली पोलिस ठाण्याच्या कोठडीत न ठेवता त्यांना सावंतवाडी पोलिस कोठडीत आणण्यात आले.

वेंगुर्ले, सावंतवाडी,दोडामार्ग पोलिस ठाण्यांनाही विशेष सूचना देऊन पोलिस कोठडी सुसज्ज ठेवण्याचे आदेश पोलिस मुख्यालयातून देण्यात आले होते. त्यानुसार सायंकाळी 6.30 वा. पासून सावंतवाडी पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्या आदेशानुसार पोलिस अधिकारी व कर्मचारी कामात व्यस्त होते.

रात्री 10.30 वा. च्या सुमारास पोलिसांच्या कडक बंदोबस्तात नितेश राणे यांना सावंतवाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी दंगल काबू नियंत्रण पथक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस तैनात होते.

Back to top button