चिपळूण : रस्त्याअभावी आजारी वृद्धाला काठीच्या झोळीतून नेले रुग्णालयात | पुढारी

चिपळूण : रस्त्याअभावी आजारी वृद्धाला काठीच्या झोळीतून नेले रुग्णालयात

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील दुर्गम अशा धनगरवाड्या वस्त्यावर अजूनही रस्ता पोहचलेला नाही. आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना धनगर कातकरी अजूनही प्रवाहाच्या बाहेरच आहेत. असाच अनुभव पेढामबे धनगरवाडी येथे आला. रस्ताच नसल्याने आजारी वृद्धाला चक्क काठीला बांधलेल्या झोळीतून डॉक्टरकडे नेत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ज्येष्ठ नागरिक पदु धाऊ खरात (वय 75, रा. पेढांबे रिंगेवाडी, ता. चिपळूण) यांना उपचारासाठी बांबूला बांधलेल्या झोळीतून घेऊन जात असताना हा व्हिडीओ आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीतील गावांमध्ये अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे. मागील दीड वर्षापूर्वी याच ठिकाणी मनीषा शेळके या महिलेला प्रसुतीसाठी बांबूला बांधून घेऊन जात असताना मध्ये रस्त्यात तिची प्रसुती झाली होती. परंतु शासनाचे अजूनही डोळे उघडले नाहीत.

डोंगरी विकास, तांडा वस्ती सुधार, प्रधानमंत्री ग्रामसडक, मुख्यमंत्री ग्रामसडक आदी योजना कोठे आहेत असा सवाल येथील लोक करीत आहेत.

Back to top button