रत्नागिरी : जगबुडीने ओलांडली इशारा पातळी | पुढारी

रत्नागिरी : जगबुडीने ओलांडली इशारा पातळी

खेड/रत्नागिरी / राजापूर ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच शनिवारच्या रात्रीपासून पावसाने पुन्हा धुवाँधार बरसायला सुरुवात केली आहे. जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. गेल्या चोवीस तासांत 115 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात किनारी गावांना ‘रेड अ‍ॅलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. खेडमध्ये संततधार सुरू असून राजापुरात पूर स्थिती असून जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

खेड तालुक्यातील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. गेले तीन दिवस संततधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांशी भातशेती पाण्याखाली गेली आहे.

संततधार पावसामुळे खेड शहरालगत वाहणार्‍या जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्याच्या पाण्याची पातळीही कमालीची वाढली आहे. या दोन्ही नद्याचे पाणी कधीही शहरात शिरण्याची शक्यता असल्याने व्यापारी आणि नागरिकांनी सतर्क रहावे असा सावधानतेचा इशारा नगर पालिका प्रशासनाने दिला आहे.

आगामी चार दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्यामुळे दुर्गम भागासह किनारी गावात रेड अ‍ॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

पावसाने अर्जुना आणि कोदवली नदयाना पुर आला असून पुराच्या पाण्याने पुन्हा एकदा शहर बाजारपेठेत पुराच्या पाण्याने शिरकाव केला असून सोवारी सकाळी पुराच्या पाण्याने जवाहर चौकातील ध्वजस्तंभाला वेढा दिला होता.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे गोव्यात करमळी तसेच थीवी कोकण रेल्वे मार्गावरील बोगद्यात माती कोसळत असल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे.

ऐन लावणीच्या वेळेत दडी मारलेल्या पावसाचे गेल्या आठवड्यात जोरदार पुनरामन झाले आणि शेतकर्‍यानी खोळंबलेल्या लावण्या उरकून घेतल्या. लावण्या वेळेत उरकल्यामुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसू लागले होते.

मात्र गेले तीन दिवस तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामळे भातशेती वाहून जाण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला असल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे.संततधार पावसामुळे खेड शहरालगत वाहणार्‍या जगबुडी आणि नारिंगी य दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी क्षणाक्षणाला वाढू लागली आहे.

पावसाचा जोर असाच कायम राहिला तर या दोन्ही नद्यांचे पाणी कधीही शहरात घुसण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील नद्यानाल्यानाही पुर आला आहे.

खाडीपट्टा भागातील होडकाड येथे एका ओढ्यात एक गाय आणि वासरू वाहून गेल्याची घटना घडली आहे तर काही जणांच्या घरात पाणी शिरल्याने घरांचे अशंत: नुकसान झालेले आहे. काही ठिकाणी घर, गोठ्याच्या छपरांचीही पडझड झाल्याचे वृत्त आहे. सोनगाव येथे विहिर खचल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गासह ग्रामीण रस्तेही खड्ड्यात गेले असल्याने रहदारीचा वेग मंदावला आहे. ग्रामीण भागातील काही रस्त्यांची अवस्था तर अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक मंदावली आहे.

दापोली तालुक्यातील कोळबाद्रे येथील तळी या परिसरात 18 रोजी पाणी साचले. तसेच काही काळ प्राथमिक आरोग्य केंद्र शिवाजीनगर व शिवनारी गावतळे रस्त्यावरील पुलावरुन पाणी गेल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती. पाणी साचल्याने बेजेवाडी,काताळवाडी, ब्राह्मणवाडी व बौद्धवाडी या वाड्यांचा गावाशी संपर्क तुटला आहे.

Back to top button