पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत | पुढारी

पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

कणकवली ; पुढारी वृत्तसेवा : गेले दोन दिवस सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील थिवीम स्टेशन आणि करमाळी दरम्यानच्या ओल्ड गोवा बोगद्यात पाणी व चिखल साचल्याने कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.

यामध्ये सोमवारी रात्री मुंबईकडे जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेस रद्द करण्यात आली असून मंगळवारी सीएसटी ते मडगाव जाणारी मांडवी एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे.

मार्ग वळविण्यात आलेल्या गाड्यांमध्ये ट्रेन नं.06345 लोकमान्य टिळक-तिरूअनंतपुरम सेंट्रल नेत्रावती विशेष रेल्वे सोमवारी पनवेल, कर्जत,पुणे जंक्शन, मिरज जंक्शन हुबळी, कृष्णराजपूरम,येरोदे जंक्शन,शोरानुर जंक्शन मार्गे वळविण्यात आली आहे.

तर अंशत: रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये ट्रेन नं. 01134 हे मंगळूर जंक्शन ते मुंबई सीएसटी जाणारी गाडी सोमवारी मंगळूर जंक्शन ते मडगाव जंक्शन दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली. त्या गाडीच्या प्रवाशांना मडगाव आणि करमाळीवरून रस्ते वाहतूक मार्गे थिवीमला आणण्यात आले.

तेथून तीच गाडी थीवीम ते मुंबई अशी सुटणार आहे. रविवारी सुटलेली निजामुद्दीन-एर्नाकुलम, अमृतसर -कोचीवल्ली या गाड्या पनवेल, कर्जत, पुणे जंक्शन, हुबळी, कृष्णराजापुरम, येरवडे जंक्शन, शोरांपूर जंक्शन या मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत.

तर दुरांतो स्पेशल ही एर्नाकुलम-लोकमान्य टिळक जाणारी गाडी,कोचीवल्ली पोरबंदर, एर्नाकुलम-अजमेर ही गाडी रविवारी मडगाववरून लोंडा जंक्शन, मिरज जंक्शन, पुणे जंक्शन, कर्जत, पनवेल अशा मार्गे वळविण्यात आल्या आहेत.

रविवारी सुटलेल्या कोकणकन्या एक्स्प्रेसमधील प्रवाशांना थीविम ते मडगाव असे स्थलांतरीत करण्यात आले. सोमवारी मडगाव जंक्शन ते मुंबई जाणार्‍या मांडवी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना मडगाव ते थीवीम असे स्थलांतरीत करण्यात आले. तर मडगाव-निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसमधील प्रवाशांनाही मडगाव जंक्शन ते पेरनेम दरम्यान स्थलांतरीत करण्यात आले.

सोमवारी मुंबई सीएसटी ते मडगाव जाणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना रस्ता वाहतुकीने थिवीम ते मडगाव नेण्यात आले. तसेच मंगळूरू सेंट्रल ते लोकमान्य टिळक जाणारी गाडी करमाळीपर्यंत धावली. प्रवाशांना रस्ते वाहतूक मार्गे थिवीम आणि तिथून लोकमान्य टिळकडे मार्गस्थ करण्यात आली.

Back to top button