alphonso mango : हापूस आंब्याचे यावर्षी निम्मेच उत्पादन ; बाजारात येणार तरी कधी ? - पुढारी

alphonso mango : हापूस आंब्याचे यावर्षी निम्मेच उत्पादन ; बाजारात येणार तरी कधी ?

सिंधुदुर्ग/रत्नागिरी/रायगड ; पुढारी वृत्तसेवा : कोकणची अर्थव्यवस्था तोलून धरणारा हापूस (alphonso mango) तथा फळांचा राजा लहरी हवामानाशी दोन हात करताना थकून जातो आहे. दोन वर्षांपासून कधी वादळ, कधी अवकाळीच्या तडाख्यात हापूस सापडला. यावर्षीही जेमतेम 50 टक्के पीक हाताशी लागेल आणि तेही उशिरा! त्यातही निर्यातक्षम आंबा किती असेल याची खात्री नाही. शिवाय, जगभरात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे थैमान सुरू असल्यामुळे कितपत निर्यात होईल, याचीही शाश्‍वती नाही.

पहिला हापूस बाजारात येतो तो देवगडचा. त्यानंतर रत्नागिरीचा आणि सर्वात शेवटी अलिबाग हापूस बाजारात येतो. मार्चच्या हंगामात पहिला येणारा हापूस कल्टारयुक्‍त असतो. तो बेचवच असतो. स्थानिक बाजारपेठेेत व्यापारी मोठ्या रकमेने या पेट्या विकतात. मात्र, विदेशात हा आंबा स्वीकारला जात नाही. (alphonso mango)

सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड अशा तीन जिल्ह्यांमध्ये हापूसचे पीक घेतले जाते. या तीन जिल्ह्यांत मिळून सुमारे 1 लाख 55 हजार हेक्टरवर आंब्याची लागवड आहे. वातावरण व्यवस्थित असेल, तर हा कोकणचा राजा बागायतदारांना एकरी 2 लाख रुपयांचे उत्पन्‍न देतो. कोकणात देशी-विदेशी विक्रीसह हापूस आंब्याची अडीच ते तीन हजार कोटींची उलाढाल होते. यंदा ती तितकी होईलच याची खात्री नाही.

यावर्षीचा अवकाळी पाऊस आणि लांबलेली थंडी, यामुळे हापूसचा हंगाम दोन महिने पुढे गेला आहे. एरव्ही डिसेंबर महिन्यापासूनच काही ठिकाणी आंबा विदेशात जाण्यासाठी सज्ज असतो. दरवर्षी साधारणत: मार्चच्या पहिल्या आठवड्यात हापूस पूर्णक्षमतेने बाजारात येतो. यावर्षी यावर्षी मात्र दीड महिना उशिरा म्हणजे 15 एप्रिलनंतरच हापूस दाखल होण्यास सुरूवात होईल. (पूर्वार्ध)

बागायतदार दुहेरी संकटात

ढगाळ वातावरणामुळे आंब्यावर तुडतुडा, खार रोग आणि थ्रीप्स याचे प्रमाण वाढल्याने कीटकनाशकांच्या तीन फवारण्या बागांवर कराव्या लागतात. एका फवारणीचा खर्च हा 50 कलमांमागे 25 हजारांवर पोहोचला असून, व्यवस्थापनावरील खर्चही त्यामुळे वाढला आहे. त्यामुळे उत्पन्‍नात घट होणार आहे. हंगाम लांबल्याने आंब्याचा दरही खाली येणार आहे. त्यामुळे आंबा बागायतदार दुहेरी संकटात सापडले आहेत.

रत्नागिरी : 1 लाख 13 हजार हेक्टर

150 टन    आंबा निर्यात
30 टक्के   आखाती देशात
10 टक्के   युरोप-अमेरिका
40 टक्के   मुंबई
20 टक्के   अन्य प्रदेशिक बाजारपेठ

सिंधुदुर्ग :  33,475 हेक्टर

प्रतिहेक्टर   2,400 किलो उत्पादन

रायगड :  14 हजार 500 हेक्टर

आंबा उत्पादक    52,000
बागायतदार

Back to top button