जालना : ऐन दिवाळीत शेतकरी कुटुंबावर संकट! शॉर्टसर्किटच्या आगीत घर जळून खाक

जालना : ऐन दिवाळीत शेतकरी कुटुंबावर संकट! शॉर्टसर्किटच्या आगीत घर जळून खाक

परतूर; पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील अंगलगाव (ता. परतूर) येथील शेतकरी कुटूंबाच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना रविवारी (दि.२३) सायंकाळी घडली. ऐन दिवाळीत संसारोपयोगी साहित्य जाळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

अंगलगाव (जालना) येथील तरुण शेतकरी गोपाळ सर्जेराव खंदारे (वय २७) हे नेहमीप्रमाणे कुटुंबातील सदस्यांसह शेतात गेले होते. दरम्यान सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. ही घटना शेजारील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही कळण्याच्या आत आगीने रौद्ररूप धारण करत घरातील, टीव्ही, कुलर, सोफासेट, कपाट आदी मौल्यवान वस्तूंसह इतर संसरोपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले. यामध्ये कपाटात अडकवलेल्या कपड्यातील रोख ५४ हजार रुपये तसेच सर्व किमती वस्तू, संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाले. नागरिकांनी अग्निशमन दलाल दूरध्वनी करत माहिती कळवली. मात्र, अंगलगावचे शहरापासून अंतर दूर असल्याने अग्निशमन दल पोहचू शकले नाही. नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. खंदारे कुटूंबाला घरी आल्यावर घराची झालेली राखरांगोळी पाहून रडू कोसळले.

घटनेची माहिती कळताच आष्टी पोलीस ठाण्याचे जमादार जनार्दन पालवे व कर्मचाऱ्यांनी धाव घेत पंचनामा केला. तसेच मंगळवारी सरपंच आप्पासाहेब खंदारे, तलाठी कैलास सुंदरडे, ग्रामसेवक कृष्णा नागवे, पोलीस पाटील कैलास खंदारे, नागेश खंदारे आदींच्या उपस्थित पंचनामा करण्यात आला. या अगीत घरातील किमती वस्तू तसेच रोख रक्कम असे एकूण सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची नोंद पोलीस, महसूल प्रशासनाने केली आहे. दरम्यान ऐन दिवाळीत शेतकरी कुटुंबावर ओढवलेल्या या प्रसंगामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news