जालना : त्या अनोळखी महिलेच्या खुनाचा छडा लावण्यात घनसावंगी पोलिसांना यश | पुढारी

जालना : त्या अनोळखी महिलेच्या खुनाचा छडा लावण्यात घनसावंगी पोलिसांना यश

घनसावंगी प्रतिनिधी :  घनसावंगी तालुक्यातील बोधलापुरी येथील अनोळखी महिलेच्या आव्हानात्मक खुनाच्या गुन्ह्याचा सात दिवसांच्या आत लावला छडा लावण्यात घनसावंगी पोलिसांना यश मिळवले आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावल्याने घनसावंगी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

25 जुलै रोजी तालुक्यातील बोधलापुरी शिवारातील एका पुलाखाली एका 40 ते 45 वर्षीय महिलेचे प्रेत आढळून आले होते. या महिलेच्या डोक्यावर आणि छातीवर दगडाचे घाव घातलेले असल्याने तिची ओळख पटणे अवघड झाले होते. घनसावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून घेत तपासचक्रे जोराने फिरविली.

त्यानंतर ही मृत महिला लिंबोनी येथील गंगुबाई काळे ही असल्याची ओळख पटली आणि ती विधवा असल्याचे पोलिसांना कळाले. त्यानंतर पोलिसांनी सूत्रे हालवून तिच्या संपर्कात असलेल्या महिलेकडून माहिती घेतली असता ती मृत महिला शनिवारी रात्री तिर्थपुरी येथील महादेव कडुकर या व्यक्तीसोबत मोटारसायकलवरून गेल्याचे पुढे आले होते. पोलीस निरीक्षक महाजन आणि त्यांच्या पथकाने तातडीने तिर्थपुरी येथील महादेव कडूकर याच्या घरी जाऊन त्यास गुन्ह्याच्या चौकशी साठी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करीत असताना त्याने सुरुवातीला तपासामध्ये कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही व हा गुन्हा केला नसल्याचे सांगत होता. परंतु पोलिसांनी त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हा गुन्हा केल्याचे कबुल केले.

मृत गंगुबाई काळे व महादेव कडूकर याचे अनैतिक संबंध होते. गंगुबाई हिने महादेव कडूरकर याला एक लाख रुपयाची मागणी केली होती व पैसे न दिल्यास मी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करेल अशी धमकी देत होती.  त्यानंतर महादेव कडूरकर याने तिला विश्वासात घेवून बोधलापुरी शिवारातील पुलाखाली नेले व तिला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. यावेळी रागाच्या भरात महादेव कडूरकर याने गंगुबाई काळे हीचा गळा आवळून ओढ्यात नेले व  त्याने तिच्या डोक्यात व छातीवर दगडाने मारुन कोणताही पुरावा न ठेवता गंगुबाईचे प्रेत कोणाला दिसू नये म्हणून ओढ्यामध्ये असलेल्या झाडाझुडुपांमध्ये टाकून दिले. अशी माहिती  महादेव कडूरकर याने पोलिसांना देत खुन केल्याची कबुली दिली. त्यानंतर महादेव कडूकरकर याला अटक करत गंगुबाई काळे खुन प्रकरणाचा छडा लावला.

ठाणे घनसावंगी येथील अधिकारी व अंमलदार यांनी सातत्याने प्रयत्न करुन हा आव्हानात्मक गुन्हा 7 दिवसाच्या आत उघडकीस आणला.
ही कामगीरी पोलीस अधिक्षक डॉ.अक्षय शिंदे, अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन , पो लीस उपनिरीक्षक संतोष मरळ , पोलीस कर्मचारी विठ्ठल वैराळ , सुनील वैद्य ,योगेश गायके , रमेश राऊत , सीमा चौधरी आदींनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली आहे.

  हेही वाचलंत का?

 

Back to top button