मुंबई : नेपाळमध्ये समाजमाध्यमांवरील बंदीविरोधात स्थानिक तरूणांनी केलेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमिवर नेपाळमध्ये महाराष्ट्रातून पर्यटनासाठी गेलेले १५० पर्यटक अडकून पडले आहेत. यामध्ये ठाण्यातील ६७ तर पुणे १९ व बीडमधील ११ पर्यटकांचा समावेश आहे. हे सर्व पर्यटक सुखरूप असले तरी नेपाळमधील सध्याची परिस्थिती पाहता राज्य सरकारने पर्यटकांना नेपाळमध्ये जाऊ नये असे आवाहन केले आहे. (Latest Mumbai News)
महाराष्ट्रातील नागरिक मोठ्या संख्येने नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेले आहेत. परंतु, तेथे समाजमाध्यमावरील बंदीमुळे स्थानिक तरूणांनी केलेल्या जाळपोळीमुळे नेपाळमध्ये निर्माण झालेल्या अराजकतेमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, लातूर, कोल्हापूर, बीड, अकोला, यवतमाळ येथून पर्यटनासाठी गेलेल्या १५० पर्यटकांची मोठी कोंडी झाली आहे. नेपाळमधील विविध भागात हे पर्यटक अडकले असून ते सुखरूप आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक भालचंद्र चव्हाण यांनी दिली.
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांनी जेथे राहत आहेत तेथेच सुरक्षित राहावे, अनावश्यकपणे बाहेर पडू नये, तसेच स्थानिक भारतीय दूतावासाच्या सुचनांचे पालन करावे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. नेपाळमधील चिघळलेली परिस्थिती शांत झाल्यास उद्यापासून विमान सेवा सुरू होण्याची शक्यता आहे, असा विश्वास व्यक्त करत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दुतावासाच्या संपर्कात असून राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरविण्याचे प्रयत्न करत आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान,राज्यातील हे सर्व पर्यटक विविध टूर ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नेपाळमध्ये गेले होते. बीड जिल्ह्यामधील ११ पर्यटक खाजगी बसने परत यायला निघालेले असून ते उत्तर प्रदेशातील गोरखपूरपर्यंत पोहोचले आहेत.