

पुणे: राज्यात शुक्रवारपासून पावसाचा जोर काही भागात वाढणार असून आगामी तीन दिवस आठ जिल्ह्यांना ऑरेंज तर चोवीस जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. घाटमाथा आणि कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
प्रामुख्याने मुंबई, पुणे शहरासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, पुणे, सातारा या घाटमाथ्यांना तीन दिवस सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील सात दिवसांत वायव्य, मध्य, पूर्व आणि ईशान्य भारतातील अनेक भागांसह पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नैऋत्य राजस्थान, गुजरात प्रदेश, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, बिहार, अंदमान आणि निकोबार बेटे, पश्चिम मध्य प्रदेश,
पूर्व उत्तर प्रदेश, ओडिशा, आसाम आणि मेघालय, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकातील काही ठिकाणी वार्याचा वेग ताशी 40 ते 60 किलोमीटर झाला आहे.
समुद्रसपाटीवरील एक कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्र-कर्नाटक किनारपट्टीवर आहे. तसेच पश्चिम राजस्थान आणि ईशान्य मध्य प्रदेशात वार्याची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. ईशान्य अरबी समुद्रापासून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाची पट्टी तयार झाल्याने मध्यमहाराष्ट्रातील घाटमाथ्यावर 6 व 7 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
-ऑरेंज अलर्ट (अतिमुसळधार)ः रायगड (4 ते 7), रत्नागिरी (4 ते 7), सिंधुदुर्ग (5 व 6), नाशिक घाट (6 व 7), पुणे घाट (4 ते 7), कोल्हापूर घाट (5 व 7) सातारा घाट (4 ते 7)
-यलो अलर्ट (मुसळधार)ः पालघर (5 ते 7), ठाणे (5 ते 7), मुंबई (4 ते 7), सिंधुदुर्ग (4 व 7), धुळे (6), नंदुरबार (7), जळगाव (5 व 6), नाशिक (6 व 7), सातारा (6 व 7), छ.संभाजीनगर (5 ते 7), जालना (5 ते 7), बीड (6 व 7), हिगोली (5 ते 7), नांदेड (6 व 7), अकोला, अमरावती, भंडारा (6 व 7), चंद्रपूर (7), गडचिरोली (5 ते 7), गोंदिया (5 ते 7), नागपूर (6 व 7), वर्धा (6 व 7), वाशिम (6 व 7), यवतमाळ (6 व 7)