

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
हौसेला मोल नाही म्हणत वाहनांच्या फॅन्सी नंबरसाठी लाखो रुपये मोजणाऱ्या नागरिकांची कमी नाही. नागरिकांची ही हौस आता महागली आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने फॅन्सी नंबरचा भाव वाढविला आहे.
पूर्वी दुचाकीसाठी असणारा ५० हजारांचा दर आता एक लाख रुपये केला आहे, तर चारचाकीसाठी असणारा एक लाखाचा दर पाच लाख रुपये केला आहे. याबाबतचा आदेश ३० ऑगस्टला काढण्यात आला आहे. परिवहन विभागाने काढलेल्या आदेशात दुचाकी, तीनचाकी परिवहन वाहनांसाठी एक क्रमांकाला आता एक लाख रुपये मोजावे लागणार आहेत,
तर याच वाहनांसाठी ९, ९९, ७८६, ९९९ आणि ९९९९ या क्रमांकासाठी ५० हजार रुपये मोजावे लागणार आहेत, तर १११ २२२ अशा पटीतील क्रमांकांसाठी २५ हजार रुपये आकारण्यात येणार आहेत. २, ३, ४, ५ अशा क्रमांकासाठी १५ हजार रुपये आकारले जाणार आहेत. चारचाकीसाठी अनुक्रमे पाच लाख रुपये, २ लाख ५० हजार रुपये, एक लाख रुपये, ७० हजार रुपये आकारण्यात येणार आहेत.