Accident: कोल्हापुरातल्या एकाच कुटुंबातील तिघांचा अपघातात मृत्यू

Accident: कोल्हापुरातल्या एकाच कुटुंबातील तिघांचा अपघातात मृत्यू

नातेवाईकाच्या श्राद्धकार्यासाठी कर्नाटकातील अंकोला (जि. कारवार) येथे जाणार्‍या कोल्हापुरातील रामानंदनगर येथील एकाच कुटुंबातील तिघांचा बुधवारी कार अपघातात ( Accident ) मृत्यू झाला. भागवती (ता. हल्लाळ) येथे हा अपघात झाला.

मीना गणेश पिल्ले (वय 50), राजम्मा पिल्ले (55), सरस्वती राधाकृष्ण पिल्ले (35) अशी मृतांची नावे आहेत. राधाकृष्ण गणेश पिल्ले (40) व त्यांची मुलगी ज्योती हे दोघे अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर हल्याळ येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण अंकोला येथे नातेवाईकांच्या श्राद्धकार्यासाठी निघाले होते.

त्यांची कार हल्याळ-यल्लापूर रस्त्यावरील हल्याळ शहरापासून 20 कि.मी. अंतरावरील भागवती तंटीहळ्ळ येथे आली असता चालक राधाकृष्ण यांचे कारवरील नियंत्रण सुटले. कार उलटून रस्त्याकडेच्या खड्ड्यात पडली. यामध्ये मीना पिल्ले यांचा जागीच मृत्यू झाला. राजम्मा पिल्ले यांना हल्याळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर जखमी सरस्वती पिल्ले यांना हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचाही उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा ( Accident )

हल्याळ (जि. कारवार) येथे नातेवाईकांच्या श्राद्धाला गेलेल्या वाहनाचा अपघात होऊन रामानंदनगरातील तीन महिलांचा मृत्यू झाला. मीना पिल्ले, राजम्मा पिल्ले, सरस्वती पिल्ले अशी मृतांची नावे आहेत. तर राधाकृष्ण गणेश पिल्ले व त्यांची मुलगी ज्योती जखमी झाले. पिल्ले कुटुंब हे मूळचे कर्नाटकातील असून, तीस ते चाळीस वर्षे त्यांचे रामानंदनगरात वास्तव्य आहे. तीन कुटुंबे एकमेकांजवळ राहण्यास असून, अत्यंत गरिबीतून चरितार्थ चालवीत होती.

कुटुंबातील पुरुष मोलमजुरीची कामे करतात, तर महिला धुण्या-भांड्याची कामे करून चरितार्थ चालवीत होत्या. रामानंदनगर परिसरातही ही कुटुंबे सर्वपरिचित होती. अत्यंत गरिबी आणि हलाखीचे जीवन जगणारी कुटुंबे अनेकांच्या मदतीला जाणारी होती. या तिन्ही कुटुंबांवर अपघाताच्या निमित्ताने दु:खाचा डोंगर कोसळला असून, रामानंदनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news