बेळगाव महापालिका निवडणूक : महाराष्ट्र एकीकरण समितीचा निर्धार, ‘45 पार’ | पुढारी

बेळगाव महापालिका निवडणूक : महाराष्ट्र एकीकरण समितीचा निर्धार, ‘45 पार’

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : मराठी माणसांवर फिरवण्यात येणारा कानडी वरवंटा, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार होणारा अवमान, भगवा ध्वज डावलून अनधिकृत लाल-पिवळ्या ध्वजाला देण्यात येणारे पोलिस संरक्षण अशा अन्यायी कृत्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी महापालिका निवडणूक मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने 45 हून अधिक उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.

त्यासाठी प्रत्येक प्रभागातून एकच मराठी उमेदवार रिंगणात उतरावा, असे ठरवण्यात आले. प्रत्येक प्रभागातील एका उमेदवाराची निवड स्थानिक पंचांनी करावी, असा ठराव करत मंगळवारी निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले. दरम्यान, अर्ज भरण्याची शेवटची तारीख 23 असल्याने समितीला ही प्रक्रिया तातडीने राबवावी लागेल.

महापालिका निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी मंगळवारी मराठा मंदिर सभागृहात शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी अध्यक्षस्थानी होते.

दळवी म्हणाले, महापालिका निवडणुकीत मराठी माणसांना फटका बसावा, असे नियोजन सरकारकडून करण्यात येत आहे. कोरोना महामारी असतानाही ऐनवेळी निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बेळगाव महापालिकेवरील मराठी भाषिकांचे वर्चस्व कमी व्हावे, यासाठी हरतर्‍हेने प्रयत्न करण्यात येत आहेत. उमेदवारी अर्जही मराठीत न देता घटनात्मक हक्‍क डावलण्यात येत आहेत. त्यामुळे अशा स्थितीत कर्नाटक सरकारला उत्तर देण्यासाठी 45 हून अधिक उमेदवार महापालिकेत निवडून आणणे गरजेचे आहे.

मध्यवर्ती समिती कार्याध्यक्ष मनोहर किणेकर म्हणाले, बेळगाव हा सीमावासीयांचा केंद्रबिंदू आहे. तरीही मराठी भाषिकांवर अन्याय करण्याची एकही संधी कर्नाटक प्रशासन सोडत नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांत मराठी जनतेवर फिरवण्यात येणारा कानडी वरवंटा, ठिकठिकाणी होत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान याचा वचपा काढण्यासाठी महापालिकेवर समितीच्या मराठी भाषिकांचा भगवा फडकावाच लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक आपापसात न होता आपला एकच उमेदवार असेल, ही काळजी संबंधित प्रभागातील पंचांनी-नेत्यांनी घ्यावी.

लोकसभा पोटनिवडणुकीत समितीच्या उमेदवाराने लाखावर मते घेतल्याने महापालिकेवर भगवा ध्वज पुन्हा फडकावला जाण्याची आशा मराठी भाषिकांना आहे. 1989 मध्ये महापालिकेचे 51 प्रभाग असताना तब्बल 39 नगरसेवक मराठी होते. तर 2005 च्या सभागृहातही 58 प्रभाग असताना मराठी नगरसेवकांची संख्या 39 होती. आता ही संख्या 45 पार नेण्याचा निर्धार करण्यात आला.

आधीच राजीनामा घ्या!

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठिंब्यावर निवडणुकीत विजय मिळवून महापालिकेत वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात येतात. समितीच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. त्यामुळे आम्ही तोंडघशी पडत आहोत. त्यामुळे यावेळी समितीचा अधिकृत शिक्‍का मारलेल्या उमेदवारांकडून आधीच राजीनामा लिहून घ्यावा आणि नगरसेवकांवर जरब ठेवावी, अशी मागणीही बैठकीत अनेकांनी केली.

बैठकीत महेश कदम, मदन बामणे, श्रीकांत मांडेकर, सागर पाटील, माजी नगरसेवक सुरेश रेडेकर, राजू बिर्जे, शिवसेनेचे दत्ता जाधव, कोरे गल्‍लीतील रणजीत हावळाणाचे, जुने बेळगाव येथील नितीन खन्‍नूकर, अहमद रेशमी, धनंजय पाटील आदींनी मनोगत व्यक्‍त केले. माजी नगरसेवक रणजीत चव्हाण?पाटील यांनी स्वागत केले. राजू मरवे यांनी आभार मानले. सरचिटणीस मालोजी अष्टेकर, अ‍ॅड. राजाभाऊ पाटील यांनी आभार मानले.

प्रकाश मरगाळे, आर. आय. पाटील, आर. के. पाटील, बी. ओ. येतोजी, विकास कलघटगी, बी. एस. पाटील, एस. एल. चौगुले, रावजी पाटील, कृष्णा हुंदरे, आर. आय. पाटील, महेश जुवेकर, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, श्रीकांत मांडेकर, मयूर बसरीकट्टी, मल्‍लाप्पा पाटील, डी. बी. पाटील, अप्पासाहेब पुजारी, माजी उपमहापौर मधुश्री पुजारी, गणेश दड्डीकर, राजू पावले आदी उपस्थित होते.

एकजुटीने करू महापालिका काबीज

सध्याच्या तरुणाईसह अनेक जण समितीकडे एका प्रभागात एकच उमेदवार देण्याची मागणी करत आहेत; पण ही जबाबदारी प्रभागातील पंचांची समितीची आहे. पंचांनी आपल्या एका उमेदवाराचे नाव समितीकडे पाठवले तर त्यावर शिक्‍कामोर्तब करून अधिकृत प्रचार करण्यात येईल. त्यामुळे या निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने बेळगावची महापालिका काबीज करायची आहे. प्रत्येकाला सीमाप्रश्‍नाबाबत तळमळ आहे. ती तळमळ निवडणुकीतूनही दाखवून देण्याची गरज आहे, असे दीपक दळवी म्हणाले.

ज्येष्ठ, जाणकारांवर जबाबदारी

महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागात एकच उमेदवार निवडायचा, त्याचे नाव समितीकडे पाठवण्याची जबाबदारी प्रभागातील पंच आणि सीमाप्रश्‍नी योगदान दिलेल्या नेत्यांवर असणार आहे, तसा ठराव बैठकीत करण्यात आला.

Back to top button