काँग्रेस आमदार जमीर अहमद, बेग यांच्यावर ‘ईडी’चे छापे

बंगळूर : कॅन्टोन्मेंट परिसरातील आ. जमीर अहमद खान यांचा बंगला.
बंगळूर : कॅन्टोन्मेंट परिसरातील आ. जमीर अहमद खान यांचा बंगला.
Published on
Updated on

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : भ्रष्टाचार, बेकायदेशीरपणे रक्कम वर्ग करणे, आयएमए घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने गुरुवारी सकाळी काँग्रेस आमदार जमीर अहमद खान, माजी आमदार रोशन बेग यांच्या निवासासह सहा ठिकाणी छापे घालून तपास केला. या दोघांनाही आता अटकेची भीती आहे. दरम्यान, हे छापे म्हणजे भाजप सरकारचे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

आ. खान यांचा कॅन्टोन्मेंटनजीकचा बांबू बाजार येथील बंगला, कलासीपाळ्या येथील नॅशनल ट्रॅव्हेल्सचे कार्यालय, युबी सीटीतील प्लॉट, वसंतनगरातील जुने घर, सदाशिवनगरातील नातेवाईकाचे घर, माजी आमदार रोशन बेग यांचे शिवाजीनगरातील घर अशा सहा ठिकाणी एकाचवेळी छापे घालण्यात आले.

प्राप्तीकर खात्यातील दोन आणि सक्तवसुली संचलनालयातील 45 अधिकार्‍यांनी एकाचवेळी छापे घालून तपास केला. आयएमए घोटाळ्यातील प्रमुख संशयित मन्सूर अली खानला आमदार खान यांनी रिचमंड टाऊन येथील 90 कोटींचा बंगला विकला होता. सरकारी कार्यालयात या बंगल्याची किंमत केवळ 9.38 कोटी रुपये नोंदवण्यात आली.

त्यामुळे कर बुडवण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याबाबत सक्तवसुली संचालनालयाने नोटीस जारी करुन आ. खान यांच्यासह काहीजणांची चौकशी केली होती. त्यावेळी अधिकार्‍यांनी विचारलेल्या काही प्रश्नांना त्यांनी योग्य उत्तर दिले नव्हते.

मन्सूर अलीकडून घेतले 9 कोटी

आमदार जमीर अहमद खान यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी मन्सूर अली खानकडून 5 कोटींचे दागिने घेतले होते. शिवाय त्याच्याकडून आणखी 4 कोटी रुपये घेतल्याचीही माहिती मिळाली आहे. याबाबत चौकशी सुरु आहे.

छाप्यांमागे राजकीय षड्यंत्र : डी.के.शिवकुमार

भाजपमध्ये सर्वजण प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेचे आहेत का? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी उपस्थित केला. यामागे राजकीय षड्यंत्र असून केवळ काँग्रेस नेत्यांवरच छापे का टाकले जातात, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

नवी दिल्ली येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले प्राप्तीकर, सीबीआय व इतर अधिकार्‍यांकडून काँग्रेस नेत्यांना लक्ष्य बनवले जाते. काँग्रेस आमदार जमीर अहमद खान यांच्या घरावर छापे टाकण्यात आले. यामागे राजकीय षडयंत्र आहे. एका विशिष्ट समाजाला लक्ष्य बनवण्यात येत आहे. याविरुद्ध योग्य उत्तर देण्यास जमीर अहमद समर्थ आहेत.

या छाप्यांमागे केवळ त्या नेत्यांचा छळ करण्याचा उद्देश आहे. कोलारमधील निजद आमदार श्रीनिवासगौडा यांनी विधानसभा अधिवेशनावेळी भाजपच्या काही कारस्थानांची माहिती उघड केली होती. आपल्याला भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी 30 कोटींचे आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता.

भाजपचे अश्वत्थनारायण आणि इतरांनी 5 कोटी रुपये आपल्या घरी पोहोचवले होते, अशी माहितीही श्रीनिवासगौडांनी दिली होती. आयएमए घोटाळ्या प्रकरणी कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली तर त्यास आपली कोणतीच हरकत नाही. पण, त्यामागे राजकारण असू नये, असे मत डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news