पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग अपडेट : तर बेळगाव-कोल्हापूर वाहतूक सुरू? | पुढारी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग अपडेट : तर बेळगाव-कोल्हापूर वाहतूक सुरू?

निपाणी : पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग अपडेट : मुसळधार पावसाने सौंदलगा हद्दीत सखल भागात पाणी आल्याने बंद आहे. दरम्यान आज (दि. २५) सकाळी १० वाजता वर आलेल्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. महामार्गावर पश्‍चिमेकडील बाजूला ४ फूट तर पूर्वेकडे ६ फूट पाणी आहे. त्यामुळे रविवारी दुपारनंतर बेळगाव, कोल्हापूर वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री निपाणी तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. तालुक्यातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत.

विशेष करून कोडणी व महामार्गावर सौंदलगा या टापूत आलेल्या परिस्थितीची पाहणी मुख्यमंत्र्यांकडून होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने सध्या निपाणी पोलिस प्रशासनाने सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

सद्या ‘एनडीआरएफ’ पथकाने अत्यावश्यक सेवेतील नागरिकांची यांत्रिक बोटीद्वारे होणारी वाहतूक थांबवली आहे.

ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे सौंदलगा ते निपाणी या मार्गावर अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसह रुग्णांची वाहतूक सुरू आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून आहेत.

त्यामुळे वाहनधारकांसाठी स्थानिक ग्रामस्थांसह सामाजिक संघटनांनी गेल्या चार दिवसापासून नाष्टा व जेवणाची सोय केली आहे.

निपाणी तालुक्यातील वेदगंगा, दूधगंगा नदी काठावरील सुमारे २५ गावांना पुराचा फटका बसला आहे. यामध्ये ४ हजार नागरिकांचे निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आले आहे.

यामध्ये दुधगंगा नदी काठावरील कुन्नूर गावाला तिन्ही बाजूंनी महापुराने वेढा दिल्याने या गावचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शनिवारी कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्यासह बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी तालुक्यातील पूरस्थितीची पाहणी केली.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग अपडेट : एकेरी आंतरराज्य वाहतूक सुरू होण्याची शक्यता

सद्यस्थितीत सौंदलगा हद्दीतील मांगुर फाटा ते वेदगंगा नदीवरील पुलापर्यंत महामार्गाच्या पश्चिमेकडे महामार्गावर रविवारी सकाळी ४ फूट इतके पाणी होते.

मात्र पूर्वेकडे जमिनीचा सखल भाग असल्याने अद्यापही ६ फूट पाणी आहे.

बुधवार रात्रीपासून पुराच्या पाण्यात महामार्गावर अडकून पडलेल्या ट्रकचा निम्मा भाग उघडा झाला आहे.

त्यामुळे प्राप्त परिस्थितीत रविवारी दुपारनंतर महामार्गावरील पश्चिमेकडील पाण्याच्या पातळीत घट होऊन, एकेरी आंतरराज्य वाहतूक सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असले तरी प्रशासन काय निर्णय घेते यावर सगळे अवलंबून आहे.

हे ही पाहा : 

Back to top button