Knife attack : मेरी बहेन को मारा म्हणत एकाने डॉक्टरवर केला चाकू हल्ला | पुढारी

Knife attack : मेरी बहेन को मारा म्हणत एकाने डॉक्टरवर केला चाकू हल्ला

औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा : पोट दुःखत असल्याचा बहाणा करून शासकीय कर्करोग रुग्णालयातील डॉक्टरच्या घरात घुसून एकाने त्यांच्यावर चाकूहल्ला (Knife attack) केला. यात डॉक्टर अब्दुल राफे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना कॅनॉट प्लेस परिसरातील एका अपाटमेंटमधील त्यांच्या राहत्या घरी मंगळवारी (दि. ७) रात्री घडली.

अधिक माहिती अशी की, शासकीय कर्करोग रुग्णालय येथे कार्यरत असलेले डॉक्टर अब्दुल राफे (अंकोसर्जन) हे कॅनॉट भागात अपार्टमेंटमध्ये राहतात. ते नित्यनियमाप्रमाणे ड्युटीवरून कॅनॉट प्लेस येथील घरी आले. त्यानंतर काही तासांमध्ये त्यांच्या घरी एक अनोळखी व्यक्ती आला. (Knife attack)

त्याने पोटात दुखत असल्याचे सांगून एका चिठ्ठीवर गोळ्या-औषधी लिहून घेतल्या. त्या गोळ्या औषधी पुन्हा दाखविण्यासाठी डॉक्टरांना भेटायला आला. डॉक्टरांनी त्याला गोळ्या कशा पद्धतीने घ्यायच्या हे सांगत असताना त्याने त्याच्या जवळील धारदार चाकू काढून डॉक्टर अब्दुल राफे यांच्या पोटात खुपसला.

अचानक झालेल्या चाकू हल्ल्यात डॉ. राफे हे जखमी झाले. हा गोंधळ झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्या व्यक्तीला पकडले. तेव्हा त्याने या डॉक्टरने माझ्या बहिणीला मारले आहे, असे म्हणून नागरिकांच्या हाताला झटका देऊन पळून गेला. त्याची मोटारसायकल डॉक्टरांच्या अपार्टमेंटच्या खाली पडलेली होती. या घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी आले. (Knife attack)

तोपर्यंत डॉक्टर राफे यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़. पोलिसांनी पल्सर दुचाकी जप्त केली आहे. ही दुचाकी गुलबर्गा (कर्नाटक) या भागातील असल्याचे तपासात स्पष्ट होत आहे. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणात सिडको पोलिस तपास करत होते. हल्ल्याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

Back to top button