औरंगाबाद : पिसादेवीत छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वरूढ पुतळ्याचे आगमन | पुढारी

औरंगाबाद : पिसादेवीत छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वरूढ पुतळ्याचे आगमन

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पिसादेवी येथे रविवारी (दि.८) जल्लोषात आगमन झाले. छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्वागतासाठी पिसादेवी परिसरातील हजारो शिवभक्त व नागरिकांनी अभूतपूर्व गर्दी केली होती. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर, शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या गगणभेदी घोषणा देत महाराजांचे स्वागत करण्यात आले.

पिसादेवी येथील जुन्या शिवस्मारकाच्या नुतनीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू होते. पुतळ्याचे काम अंतिम टप्यात आलेनंतर चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये या पुतळ्याचे आज आगमन झाले. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतून निघालेली ही मिरवणुक गरवारे मैदान, वोखार्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जयहिंद नगरीमार्गे पिसादेवीत पोहोचली. मिरवणुकीत भगवे झेंडे, भगवे फेटे परिधान करून शिवभक्त सहभागी झाले होते.

जय भवानी जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराय…अशा घोषणांनी शिवभक्तांनी आसमंत निनादून सोडला. पिसादेवी परिसरात शिवरायांच्या पुतळ्याचे आगमन होताच महिलांनी ठिकठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याचे औक्षण करून पुष्वृष्टी केली.

घरोघरी भगवे झेंडे, दारोदारी रांगोळ्या

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या आगमनानिमित्त पिसादेवी परिसरातील महिलांनी दारासमोर रांगोळ्या काढल्या होत्या. घरांघरावर भगवे ध्वज लावण्यात आले होते. दुचाकी, चारचाकींवरही भगवे झेंडे लावण्यात आले होते.

Back to top button