रोटेगाव-औरंगाबाद दरम्यान विद्युत रेल्वेची चाचणी यशस्वी; २०२३ अखेर प्रवाशांसाठी होणार सुरू | पुढारी

रोटेगाव-औरंगाबाद दरम्यान विद्युत रेल्वेची चाचणी यशस्वी; २०२३ अखेर प्रवाशांसाठी होणार सुरू

औरंगाबाद, पुढारी वृत्‍तसेवा : अनेक वर्षांपासून मनमाड ते नांदेड दरम्यान विद्युत रेल्वे धावावी असे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण होत असून, पहिल्या, दुसऱ्या टप्प्यातील रोटेगाव ते औरंगाबाद दरम्यान 30 डिसेंबर रोजी विद्युत रेल्वेची चाचणी यशस्वीपणे पार पडली. रोटेगावहून सायंकाळी 7.20 वाजता निघालेली 10 डब्यांची विद्युत रेल्वे औरंगाबाद रेल्वेस्थानकावर 8.10 वाजता दाखल झाली. 50 मिनिटांत सुमारे 100 च्या स्पीडने मुख्य औरंगाबादेत दाखल झाली. या रेल्वेचे सारथ्य लोको पायलट राजकुमार रोहित कुमार, सहाय्यक पायलट विनोद पवार यांनी केले.

गेल्या चार वर्षांपूर्वी विद्युतीकरणासाठी निधी मंजूर होऊनही मनमाड ते परभणीपर्यंतचे काम रखडले होते. या कामाला नुकतीच गती मिळाली असून, पहिल्या टप्प्यात अंकाई ते रोटेगावपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले. तेथील चाचणी 26 मार्च रोजी यशस्वीपणे पार पडली. दरम्यान 30 डिसेंबर रोजी रोटेगाव ते औरंगाबाद या मार्गाचीही चाचणी यशस्वी झाली. हे 70 किलोमीटरचे अंतर या विद्युत रेल्वेने केवळ 50 मिनिटांत कापले.

वर्षाअखेर विद्युत रेल्वेतून प्रवास

दरम्यान, नांदेड विभागातून विद्युतीकरणाचे काम नांदेड ते परभणी पर्यंत पूर्ण झाले आहे. परभणी ते जालना या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम वेगाने करण्यात येत आहे. हे काम 2023 या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उदिष्ट आहे. हे उदिष्ट वेळेच्या आत पूर्ण होऊन आता मराठवाड्यातील प्रवाशांना सर्वत्र विद्युत रेल्वेने प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Back to top button