राज्यात 73 हजार वीज ग्राहक सौरनिर्माते | पुढारी

राज्यात 73 हजार वीज ग्राहक सौरनिर्माते

औरंगाबाद; राम वायभट :  देशात महागाईचे चटके बसत असताना सौरऊर्जेमुळे राज्यातील तब्बल 73 हजार ग्राहक हे वीज बिलापोटी येणारा खर्च वाचवण्यासोबतच सौरऊर्जेचे निर्माते ठरले आहेत. या माध्यमातून 1297 मेगावॅट क्षमताही आस्थापित करण्यात आली आहे. यामध्ये घरगुती ग्राहकांसोबतच औद्योगिक, वाणिज्यिक वापर करणार्‍या ग्राहकांचा समावेश आहे.

देशात व राज्यात औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणार्‍या कोळशाचा साठाही सातत्याने अपुरा पडतो. पारंपरिक वीजनिर्मितीची साधने अपुरी पडत असताना आता येणार्‍या काळात सर्वांनाच विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. मात्र यावर उपाय म्हणून केंद्र सरकार ऊर्जा मंत्रालयाच्या रूफटॉप सौर प्रणाली योजनेचा सर्वसामान्य ग्राहक मोठ्या प्रमाणावर फायदा घेत असल्याचे दिसून येत आहे.

भारत सरकारचे नवी व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, महाराष्ट्र शासन व महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात रूफटॉप सोलर योजना (एमएनआरई-दोन) राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांनी रूफटॉप सोलर आपल्या छतावर बसविल्यास ग्राहकांच्या वीज बिलात बचत होईल आणि या माध्यमातून ग्राहकांना उत्पन्नही मिळणार आहे. याकरिता ग्राहकांनी जास्तीत जास्त प्रमाणात रूफटॉप सोलर या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे. रूफटॉप सोलर योजनेच्या (एमएनआरई-दोन) माध्यमातून वीज ग्राहकांना 40 टक्क्यांपर्यंतच्या अनुदानातून घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारता येतो. तसेच अनुदानाशिवायही ग्राहकांना सौरऊर्जा यंत्रणा बसवता येते.

ग्राहकांची वीज महावितरण विकत घेणार

महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठी (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना) छतावरील (रूफटॉप) सौरऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीज बिलात मोठी बचत होत आहेच; याशिवाय नेटमीटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीजही विकत (युनिट अ‍ॅडजेस्टमेंट) घेतली जाणार आहे.

 

ग्राहक वर्गवारी                            ग्राहकांची संख्या              क्षमता

घरगुती                                               51 हजार 901                      331
औद्योगिक                                           3 हजार 658                         531
वाणिज्यिक                                          11 हजार 935                      220
सार्वजनिक सेवा, पाण्यासंबंधी                        495                              50
इतर                                                    4 हजार 989                      165
एकूण                                                  72 हजार 978               1297 मेगावॅट

Back to top button